अंश गुंतवणुकीसंबंधी नित्यनेमाने मोठ-मोठय़ा सभागृहांमध्ये व्याख्याने देणाऱ्या डॉ. प्रशांत वासनकरसह मे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडचे तीन संचालक फसवणुकीप्रकरणी अखेर गजाआड झाले. त्यांनी घेतलेले ‘लाखो रुपये मिळणार कधी’ असे प्रश्न फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना सतावत आहेत. पाच हजारांहून अधिक गुंतवणूकदारांचे सुमारे दोन हजार कोटी रुपये फसले असल्याची शंका गुंतवणूकदार व्यक्त करीत आहेत.
तीनही आरोपींना सोमवारी न्यायालयात आणले तेव्हा तेथे अनेक गुंतवणूकदारांनी धाव घेतली. त्या गर्दीत काही गुंतवणूकदारांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता ‘गुंतवलेल्या रकमेचे काय’, असा प्रश्न अस्वस्थ करीत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. वासनकरांनी सहा महिन्यांपासून ते साठ महिन्यांपर्यंतच्या आठ योजनांमध्ये वार्षिक २४ ते ६० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदरांना आकर्षित केले. अडीच वर्षांत अडीच पट तसेच चार वर्षांत तिप्पट रक्कम या दोन योजनांना बहुतांश लोक भुलले. वास्तवात कुठल्याच आर्थिक संस्थेला हे शक्य नाही. मात्र, नागरिक या योजनांना बळी पडले. वासनकरांनी प्रारंभी अनेकांना व्याज दिले आहे. जेवढी जास्त गुंतवणूक तेवढा जास्त परतावा देणे त्यांनी सुरू केले. दहा गुंतवणूकदार जोडल्यास त्याला अकराव्या गुंतवणूकदाराच्या रकमेतून काही रक्कम प्रोत्साहनपर म्हणून दिली होती. गुंतवणूकदारांना आर्थिक हमी म्हणून एक लाख रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंतचे धनादेश आरोपी प्रशांत वासनकरांनी अनेकांना दिले आहेत. त्यासोबत हमीपत्रही दिले. काही वर्षे व्याजाबरोबर परतावाही दिला. त्यामुळे अनेक वर्षे घाम गाळून सेवानिवृत्त झालेल्या बहुतांश लोकांनी या योजनांमध्ये रक्कम गुंतवली. त्यातील अनेकजण मध्यमवर्गीय आहेत. कुणी एक तर कुणी चार तर कुणी तीस लाख रुपये गुंतविले आहेत, अशी माहिती काही गुंतवणूकदारांनी दिली.
एका गुंतवणूकदाराने २ कोटी ७४ लाख ३६ हजार रुपये रुपये गुंतविले आहेत. एका सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्याने सेवानिवृत्तीनंतर मिळालेले ३५ लाख रुपये वासनकरकडे गुंतविले. त्याचे व्याजही त्याला मिळत होते. एका बँक अधिकाऱ्याने मुलीच्या लग्नासाठी कामी येतील, या उद्देशाने वीस लाख रुपये गुंतविले. एका दुकानदाराने आठ लाख रुपये गुंतविले होते. त्याला तीन लाख रुपये परत मिळाले. त्यानंतर मात्र परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये चुळबुळ सुरू झाली. धनादेशही बाऊंस होऊ लागले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्यांना दमदाटीचा अनुभव येऊ लागला. त्यातच वासनकरांनी गुंतवणूकदारांना टाळणे सुरू केल्यामुळे साशंकता वाढली. लाखो रुपयांची मुद्दल जमा असल्याने ती मिळायला हवी, या उद्देशाने अनेकजण शांत राहिले. गेल्या काही महिन्यांपासून गुंतवणूकदारांचा तगादा वाढला. रक्कम परत मिळणार नाही, या भीतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भांडणही झाले. अखेर मुख्य आरोपी डॉ. प्रशांतला अटक झाली. सर्वआरोपींना पोलीस अटकही करतील. मात्र, ‘आता पुढे काय, लाखो रुपये मिळणार कधी’ असा प्रश्न या गुंतवणूकदारांपुढे कायम आहे.१ हजार ८८० गुंतवणूकदार मुख्य तीन आरोपींच्या अटकेनंतर गुन्हे शाखा त्यांच्या चौकशीत व्यस्त आहे. पोलिसांनी आतापर्यंत वासनकरच्या कार्यालयातून भरपूर कागदपत्रे जप्त केली. त्याची छाननी झाली. मे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडमध्ये नोंदणी झालेले १ हजार ८८० गुंतवणूकदार असून पोलिसांनी मुंबईतून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार या कंपनीकडे २ हजार ६८९ गुंतवणूकदारांची डी मॅट व ट्रेडिंग खाती आहेत. मुंबईच्या एका शेअर ब्रोकर कंपनीकडे वासनकरच्या सरला सिक्युरिटीजमार्फत १ हजार ४०० गुंतवणूकदारांची डी मॅट व ट्रेडिंग खाती आहेत. या कंपनीच्या एका अधिकाऱ्याने ३ हजार ६०० गुंतवणूकदार असल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली आहे. ठेवीदारांना कंपनीने पावत्या तसेच प्रॉमिसरी नोट्स दिल्या आहेत. मुख्य आरोपी प्रशांत वासनकरने इंडियन ओव्हरसीच बँकेतील त्याच्या खात्याचे धनादेश परताव्यासाठी गुंतवणूकदारांना दिले आहेत. वासनकर वेल्थ कंपनी सबब्रोकर कंपनी असून काही रकमा धनादेशाव्दारे आणि मोठय़ा रकमा रोखीने स्वीकारल्या. त्या आयएसई सिक्युरिटीज अँड सव्र्हिसेस या नावाने स्वीकारल्या. ट्रेडिंग खात्यात व्यवहार करण्यासाठी गुंतवणूकदारांकडून आममुखत्यारपत्र लिहून घेण्यात आले. त्यानंतर ‘एफ अँड ओ’ व्यवहार करून या खात्यातील रकमा वळत्या केल्या. चाळीस ते दीडशे टक्के व्याजाचे आमिष दाखविलेल्या योजनेत सर्वाधिक गुंतवणूकदार भुलले आणि मोठय़ा रकमा गुंतवल्या, असे तपासात आतापर्यंत आढळून आल्याची माहिती आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2014 रोजी प्रकाशित
बुडालेले लाखो रुपये मिळणार कधी? गुंतवणूकदारांसमोर प्रश्न कायम
अंश गुंतवणुकीसंबंधी नित्यनेमाने मोठ-मोठय़ा सभागृहांमध्ये व्याख्याने देणाऱ्या डॉ. प्रशांत वासनकरसह मे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेडचे तीन संचालक फसवणुकीप्रकरणी अखेर गजाआड झाले. त्यांनी घेतलेले ‘लाखो रुपये मिळणार कधी’ असे प्रश्न फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना सतावत आहेत.

First published on: 30-07-2014 at 08:37 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasankar wealth management fraud in nagpur