पनवेल शहरात जिल्हा उपरुग्णालय व ट्रामा केअर सेंटरच्या उभारणीचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. नियोजनाचा अभाव असल्याने प्रत्येक वर्षी नवनवीन समस्या येथे उभ्या राहत आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर शवागार व पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र तेथे सध्या पडलेल्या पावसामुळे चार ते पाच फूट खोल पाणी तुंबल्याचे पाहावयास मिळत असून येथे तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामातच ही अवस्था तर इमारत पूर्ण तयार झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या समस्यांचे काय? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
पनवेल शहरामध्ये ७७ गुंठे जागेवर या जिल्हा उपरुग्णालय व ट्रामा केअर सेंटरचे काम सुरू आहे. इमारतीचे भूमिपूजन आघाडी सरकारच्या काळात माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते झाले होते. याच भूमिपूजनाच्या कार्यक्रमात या इमारतीच्या ३० खाटांची संख्या वाढवून १०० खाटांची करण्यात आली. परंतु या वाढीव खाटांच्या मान्यतेसाठीचा प्रस्ताव सरकारी लालफितीत अडकला आहे. या रुग्णालयाचे काम २०११ पासून सुरू आहे. शिवसेनेचे ग्राहक संरक्षण कक्षाचे त्यावेळेचे काम पाहणारे चंद्रशेखर सोमण यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील व आमदार प्रशांत ठाकूर या तीनही नेत्यांनी हे रुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. आज चार वर्षे उलटली तरीही रुग्णालयाची ही इमारत अद्याप उभी राहिली नाही. या इमारतीच्या बांधकामास सुमारे १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या इमारतीचे ७५ टक्के बांधकाम झाले आहे. रुग्णालयाचे सुमारे १५ हजार चौरस फुटांचे स्लॅबचे बांधकाम सध्या सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळी पाण्याचा कोणताही विचार न केल्यामुळे या इमारतीच्या तळमजल्यावरील शवागार व वाहनतळाची जागा पाण्याखाली गेली आहे. पनवेलकरांच्या हक्कासाठी आंदोलने करणारे लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी या जिव्हाळ्याच्या रुग्णालयाच्या विषयावर सध्या कोणताही पवित्रा घेतलेला नाही. याबाबत नागरिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.
* तळमजल्यात पाच फूट खोल पाणी
* इमारतीच्या कामात नियोजनाचा अभाव
* चार वर्षांपासून धीम्या गतीने काम
* काम पूर्ण होण्यास आणखी २२ महिने लागणार
सरकारी
रुग्णालयावर भार
उरण फाटय़ावरील पनवेलच्या सरकारी रुग्णालयावर सध्या रुग्णांच्या भार आहे. या तीन मजली इमारतीमध्ये पंधरा सरकारी वैद्यकीय कर्मचारी व दोन डॉक्टरांचा ताफा तसेच पाच कंत्राटी कामगार येथे आहेत. या रुग्णालयात महिन्याला ९० शवविच्छेदन होते. तर ५० प्रसुती, सुमारे साडेचार हजार बाह्य़रुग अपघातातील जखमी रुग्ण आदी साडेसात हजार रुग्णांवर वैद्यकीय उपचार होतात. तिीसऱ्या मजल्यावरही वैद्यकीय सेवा असल्याने उपचारासाठी त्या मजल्यापर्यंत चढून जाण्यासाठी गंभीर रुग्ण व वृद्धांचे फार हाल होतात. यामुळे पनवेल शहरात उभे राहणारे हक्काचे रुग्णालय लवकर सुरू करावे, अशी मागणी सातत्याने सामान्य रुग्णांकडून होत आहे.