गडचिरोली जिल्ह्य़ात वाढत्या उन्हासोबतच पाण्याचीही समस्या उग्र होत आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने एप्रिल ते जून २०१३ या तिसऱ्या टप्प्यासाठी तयार केलेल्या पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडय़ातील उपाययोजना अद्यापही कागदावरच आहेत. कृती आराखडय़ाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाल्याने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांची अंमलबजावणी अद्यापही सुरू झालेली नाही. जिल्ह्य़ाच्या दुर्गम भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन किती गंभीर आहे, याचे हे द्योतक आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने एप्रिल ते जून २०१३ या कालावधीत संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्ह्य़ातील केवळ ११ गावे व १० वाडय़ा मिळून एकूण २१ ठिकाणी पाणीटंचाई निवारणार्थ एक कृती आराखडा तयार करून त्यात नवीन विंधन विहिरी खोदण्याच्या उपाययोजना प्रास्ताविक केल्या आहेत. उपाययोजनांची संख्या २१ असून त्यावर २६.१० लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. साधारणत: मार्चमध्ये तयार करण्यात आलेल्या या कृती आराखडय़ाला एप्रिल संपूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी मिळालेली नाही. अर्धा मे महिना लोटूनही उपाययोजनांची अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांकडून कृती आराखडा नुकताच मंजूर झाला असून आराखडय़ात प्रस्तावित उपाययोजनांची कार्यवाही लवकरच सुरू करू, असे सांगण्यात आले. यावरून हे स्पष्ट होते की, मार्च महिन्यात तयार केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील कृती आराखडय़ाला मे महिन्यात मंजुरी प्रदान करण्यात आली. टंचाईग्रस्त त्या २१ गावांमध्ये मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातही जिल्हा प्रशासनाने प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी केलेली नाही. यावरून जिल्हा प्रशासन पाणी प्रश्नाबाबत किती उदासीन आहे. हे स्पष्ट होते.
कृती आराखडय़ात ११ गावे आणि १० वाडय़ांमध्ये संभाव्य पाणीटंचाईची शक्यता वर्तवून उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. परंतु, यापेक्षा अनेक गावांमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. अनेक गावांमधील बोअरवेल्स बंद आहेत. विहिरीमधील पाणी आटले आहे. तलाव कोरडे पडले आहेत. ग्रामवासीयांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. अशा गावांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आराखडय़ात ज्या २१ ठिकाणी उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत त्यातील कोरची तालुक्यातील रानकट्टा या गावाचा समावेश आहे. या गावाची लोकसंख्या २२८ असून या गावात केवळ दोनच सार्वजनिक विहिरी आहेत. देसाईगंज तालुक्यातील बहुरुपी टोला या वाडीची लोकसंख्या केवळ ६० असून तेथे एकच सार्वजनिक विहीर आहे. आरमोरी तालुक्यातील चिचोली चक या गावाची लोकसंख्या ५० असून तेथे पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. या गावासाठी एक विंधन विहीर प्रस्तावित आहे. धानोरा तालुक्यातील पेकीनमुडझा, टोला, शिवटोला, रानवाही, चिचटोला या वाडय़ांसह खुटगाव या गावांची एकूण संख्या ५१४ आहे. यापैकी पेकीजमुडझा आणि चिचटोला या वाडय़ांमध्ये पाणीपुरवठय़ाची कोणतीही सोय नाही. तेथे साध्या विहिरी सुद्धा नाहीत. या पाच गावांमध्ये एकूण पाच विंधन विहिरी प्रस्तावित आहेत.
चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक नं. १ या गावाची लोकसंख्या ४१५ असून गावात २ सार्वजनिक विहिरी व ४ हातपंप आहेत. चंदनखेडी वन या गावाची लोकसंख्या ४५७ असून या गावात दोन सार्वजनिक विहिरी आणि तीन हातपंप आहेत. या गावामधील सार्वजनिक विहीरींचे पाणी आटले असून हातपंपही नादुरुस्त आहेत. एटापल्ली तालुक्यातील नैनवाडी या गावाची लोकसंख्या ३९० असून या गावात ३ हातपंप आहेत. परंतु, या हातपंपामधून पुरेसे पाणी येत नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. भामरागड तालुक्यातील तुर्रेमर्का, फोदेवाडा, धिरंगी आणि फुलनार या चार गावांचा टंचाई आराखडय़ात समावेश आहे. त्यापैकी फोदेवाडा या गावाची लोकसंख्या १२० असून तेथे केवळ एकच सार्वजनिक विहीर आहे.  
तुर्रेमर्का या १०० लोकसंख्या असलेल्या गावात पाण्याची कोणतीही सोय नाही. धिरंगी आणि फुलनार या गावातही पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे येथील नागरिक नदीचे, तसेच नदीत झिरे खोदून दूषित पाणी प्राषण करीत आहेत. सिरोंचा तालुक्यातील रमेश गुडम, बोरगुडम, मोगलमित्तम, गुंडमवार्ड, गेरेगुडम या पाच वाडय़ासह झिंगानूर चेक या संपूर्ण गावाची लोकसंख्या ८९९ असून त्यापैकी रमेश गुडम टोला आणि मोगल मित्तम या दोन वाडय़ांमध्ये पाण्याची कोणतीही सोय नाही. मंजुरीनंतर संथगतीने अंमलबजावणीला सुरुवात होते तोपर्यंत पावसाळ्यास प्रारंभ होताच  योजनांकडे  पाठ फिरविली जाते हा नित्याचाच अनुभव आहे.