तानसा, वैतरणा व भातसा धरणाद्वारे मुंबईची तहान भागविणाऱ्या शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईचे दुष्टचक्र कधी थांबणार आहे या गंभीर समस्येकडे नव्याने निवडून येणारे खासदार, आमदार लक्ष देणार आहेत का, असा प्रश्न तालुकावासीयांना भेडसावत आहे. पाणीटंचाईचे सावट कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच असल्याने यंदा टंचाईग्रस्त ३९ गावे व १५१ पाडय़ांसाठी अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळे येथील रहिवाशांची पाण्यासाठी रणरणत्या उन्हात पायपीट सुरू झाली आहे.
शहापूर तालुक्यातील वेहळोली व कोठारे परिसरातील चार पाडय़ांसाठी दोन टँकरच्या मागणीचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला आहे. त्याला मंजुरी कधी मिळेल या प्रतीक्षेत असलेल्या टंचाईग्रस्त गावपाडय़ातील ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले आहे. या वर्षी टंचाईग्रस्त गावपाडय़ांमध्ये कमालीची वाढ झाली असून वेहळोली, आंब्याची वाडी, चिंचवाडी, अजनुप, काटीचा पाडा, कोळीपाडा, उठावा, धसई, थालक्याचा पाडा, ढेंगणमाळ, वाशाळा, वेळुक, कोठारे, रिकामवाडी, फणसपाडा, तांबडमाळ, आदी ३९ गावे व १५१ पाडय़ांसाठी सुमारे ६० लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. गावपाडय़ांमध्ये दिवसेंदिवस कमालीची वाढ होत असून कळमगाव, वेळुक, वाशाळा आधी ग्रामपंचायतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली असल्याचे सांगण्यात आले. पाणीटंचाईने भेडसावणाऱ्या शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील १८ गावे व ७७ पाडय़ांना गेल्या वर्षी २१ मार्चला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यासाठी सुमारे ५१ लाख खर्च झाला होता. शहापूर तालुक्यातील पाणी योजनांचा बोजवारा उडाला असल्याने दरवर्षी पाणीटंचाई निवारण्यासाठी कृतिआराखडा मंजूर करण्यात येतो, परंतु तालुक्यातील दुर्गम भागातील महिला भगिनींना पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागते हे भयावह वास्तव कधी संपुष्टात येईल, असा आर्त सवाल आदिवासी गावपाडय़ातील ग्रामस्थ करत आहेत.