मोरबे धरणाचे पाणी विकून वर्षांला सुमारे ५० कोटी कमविण्याचा नवी मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहरात सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या अपरिमीत अशा नासाडीमुळे मोडीत निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मोरबेचे पाणी ठाणे, मीरा-भाईंदर, पनवेल अशा लगतच्या शहरांना विकून मोठा नफा कमविण्याचे बेत तत्कालीन आयुक्त विजय नहाटा यांच्या काळात आखण्यात आले होते. अर्थसंकल्पात उत्पन्नाच्या लेखाशीर्षांत पाणी विकून ५० कोटी मिळतील, असा अंदाजही ठरविण्यात आला होता. प्रत्यक्षात मोरबे धरणातील ४५० दक्षलक्ष लिटर पाण्यापैकी सुमारे ४०० दक्षलक्ष लिटर पाणी नवी मुंबईकरांनाच पुरवावे लागत असल्याने विकायचे काय आणि कमवायचे काय, असा प्रश्न सध्या महापालिकेतील वरिष्ठ अभियंत्यांना पडला आहे.
मुंबईनंतर स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील एकमेव महापालिका आहे. खालापूर तालुक्यातील धावरी नदीवर उभारण्यात आलेल्या मोरबे धरणात माथेरानच्या डोंगररागांतून वाहत येणारे पावसाचे पाणी अडविले जाते. माथेरान परिसरात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण तुलनेने चांगले असल्याने मोरबे धरणात दरवर्षी बऱ्यापैकी पाणीसाठा असतो, असा अनुभव आहे. त्यामुळे या धरणातील पाणी विकून नफा कमविता येऊ शकतो, असा दावा पाणीपुरवठा विभागातील अभियंते करत असत. मात्र शहरात सुरू असलेल्या पाण्याच्या नासाडीमुळे पाणीविक्रीची ही महत्त्वाकांक्षी योजना सध्या गुंडाळावी लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेने मोरबे धरण विकत घेताना पुढील २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेतले होते. २०३१ मध्ये नवी मुंबईची लोकसंख्या सुमारे २५ लाखांच्या घरात असेल असे गृहीत धरण्यात आले होते. या लोकसंख्येलाही मोरबे धरणातून मुबलक पाणी पुरविता येऊ शकेल, असे नियोजन करण्यात आले होते. या धरणातील पाणी साठवण्याची सध्याची क्षमता सुमारे ४५० दक्षलक्ष लिटर इतकी आहे. भविष्यात  धरणाची उंची वाढविता येऊ शकते. तरीही उपलब्ध असलेला पाणीसाठा २० लाख लोकसंख्येला सहज पाणी पुरवू शकतो, असे पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांचे म्हणणे आहे. असे असताना या धरणातील सुमारे ९२ टक्के पाणी जेमतेम १३ लाख लोकसंख्येवर खर्ची पडत असल्याने पाणीपुरवठा विभागातील अधिकारी चिंतातूर बनले आहेत.
नवी मुंबईत ३० हजार लिटर पाणी वापरापर्यंत ५० रुपयांचे पाणी बिल असा लोकांना खूश करणारा निर्णय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. यामुळे शहरातील सिडको वसाहतींमध्ये पाण्याची नासाडी वाढली असून प्रती माणसी ३५० लिटर इतका पाणी वापर सुरू झाला आहे, असा अहवाल पाणीपुरवठा विभागानेच सादर केला आहे. त्यामुळे २०३१ पर्यंत नियोजन असलेले पाणी आजच खर्ची पडत असल्याने पाणीविक्रीची महत्त्वाकांक्षी योजना गुंडाळण्याची वेळ सध्या महापालिकेवर आली आहे. मोरबे धरणातून मिळणारे पाणी पनवेल नगरपालिका तसेच मीरा-भाईंदर शहराला पुरवावे, अशी येथील प्राधिकरणांची अपेक्षा आहे. नवी मुंबईतील पाण्याच्या नासाडीमुळे नवी मुंबई महापालिका इतर शहरांना जल मदतीचा हात कितपत पुढे करू शकेल, याविषयी शंकाच व्यक्त केल्या जात आहेत.