दुष्काळग्रस्त भागासाठी काहीतरी भरीव मदत करावी म्हणून येथील जैन सोशल ग्रुपच्या वतीने ग्रुपचे अध्यक्ष हर्षवर्धन गांधी व त्यांच्या पथकाच्या संकल्पनेतून त्र्यंबकेश्वर परिसरातील गाव व पाडय़ातील लोकांना पिण्याचे पाणी कायमचे मिळावे म्हणून दोन हजार लिटरच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या टाक्या आणि त्या ठेवण्यासाठी लोखंडी स्टॅण्ड, नायब तहसीलदार बाळासाहेब शेवाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
ग्रुपच्या आवाहनास सदस्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्या प्रतिसादामुळेच ग्रुपने २१ पाण्याच्या टाक्या देण्याचे ठरविले. प्रत्येक गाव व पाडय़ात जाऊन जिथे शासनाचा टँकर पोहोचतो त्या ठिकाणी या टाक्या देण्यात येणार आहेत. या प्रकल्पात योगदान देण्यासाठी जैन समाजातील सर्वानी सामील व्हावे असे आवाहन ग्रुपतर्फे करण्यात आले. हे अभियान सफल होण्यासाठी संदीप कटारिया, संजय कांकरिया हे विशेष परिश्रम घेत आहेत. नाशिक जैन सोशल ग्रुपच्या वतीने त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांच्या मदतीने प्रत्येक गाव- वाडय़ा वस्त्यांवर जाऊन हे अभियान राबविण्यात येणार आहे. पाडव्यापर्यंत स्वत: ग्रुपतर्फे प्रत्येक घरात पाणी मिळावे हे उद्दिष्ट ठेवून कार्य करण्यात येत आहे.