जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठी नगर आकाशवाणीच्या माध्यमातून, संवादाद्वारे इंग्रजी शिकण्यासाठी ‘वुई लर्न इंग्लिश हा प्रकल्प १ जुलैपासून सुरू केला जाणार आहे. आकाशवाणीवरील प्रसारणामुळे या प्रकल्पाचा उपयोग केवळ जि. प.चे विद्यार्थीच नाहीतर इतर शाळांतील मुले व नागरिकांनाही होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी ही माहिती नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांना दिली. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर उपस्थित होते. या प्रकल्पासाठी जिल्हाधिका-यांनी १० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजना म्हणून उपलब्ध करून दिला आहे. ‘सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस या संस्थेने (पुणे) हा प्रकल्प तयार करून दिला आहे.
संवादाच्या माध्यमातून‘बेसिक इंग्लिश शिकवणारा हा प्रकल्प आहे. तो इयत्ता ३ री, ४ थी व ५ वीसाठी राबवला जाणार असला तरी आकाशवाणीवरील प्रसारणामुळे इतरही त्याचा लाभ घेऊ शकतात. या प्रकल्पात अध्यापनाचे  ८४  पाठ आहेत, आठवडय़ातून तीन दिवस सकाळ व सायंकाळी प्रसारण केले जाईल, त्याच्या वेळा नंतर जाहीर केल्या जातील. सकाळच्या प्रसारणानंतर शाळेत शिक्षक त्याबाबत विद्यार्थ्यांना शिकवतील व सायंकाळी विद्यार्थी पुन्हा त्याची उजळणी घरी करू शकतील. त्यामध्ये व्याकरणावर अधिक भर दिला जाणार आहे. प्रकल्पासाठी जिल्ह्य़ातील सर्व गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिका-यांची २६ जूनला कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
याचा उपयोग ग्रामीण भागातील अंगणवाडीतील बालकांसाठीही करून घेतला जाणार आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. जि. प. शाळांचे माध्यम मराठी असले तरी सध्या स्पर्धेमध्ये इंग्रजी भाषेला महत्त्व आले आहे. इंग्रजीमुळे ग्रामीण भागातील मुले इतर शाळांतील मुलांशी स्पर्धा करू शकतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.