महिलांसाठी भारत सुरक्षित करण्याचा एकमुखी ठराव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत संमत करण्यात आला. ‘महिलांविरुद्ध हिंसा : कायदा व सुरक्षा’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचा समारोप मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. रितू दिवाण यांच्या उपस्थितीत झाला.
अध्यक्षस्थानी डॉ. निशी जयकुमार होत्या. प्रा. दिवाण यांनी जम्मू-काश्मीरमधील महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर प्रकाश टाकला. लष्करी, निमलष्करी दलाकडून जम्मू-काश्मीरमधील महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. पितृसत्ताक मानसिकतेतून हे अत्याचार केले जात असून ते फार धक्कादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्या भागातील खेडय़ांमध्ये असंख्य तरुण विधवा आहेत. कारण त्यांचे पती बेपत्ता किंवा मारले गेले आहेत. अशा स्थितीत आपला दर्जा काय, हा या महिलांचा सवाल आहे. काही प्रमाणात बदल होत असून महिला आता पुढे येऊ लागल्या आहेत. मात्र कायदा व सुव्यवस्थेचे संरक्षक जर अत्याचार करत असतील तर काय होणार, असा सवाल दिवाण यांनी उपस्थित केला. डॉ. जयकुमार यांनी नैतिकता, मानवी स्वभाव यावर प्रकाश टाकला. लैंगिक अत्याचार, धार्मिक दंगल आणि एचआयव्ही संसर्ग याद्वारे हिंसा पसरवली जात असल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. मुला-मुलींना घरात समानतेची वागणूक दिली जावी, आर्थिक स्वातंत्र्य दिले जावे, नोकरीत समान संधी दिली जावी आणि नात्यांचा आदर करावयास शिकविले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी स्त्री अभ्यास केंद्राच्या विभागप्रमुख प्रा. शोभा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शिंदे यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. मुक्ता महाजन यांनी पुस्तकांचा परिचय करून दिला. शिल्पा भगत, अस्मिता राजूरकर, राजकुमार, एम. रवींद्रकुमार आणि प्रा. साजिदा शेख यांनी मनोगत व्यक्त केले. स्त्री अभ्यास केंद्राचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रा. वर्षां पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विश्रांती मुंजेवार यांनी आभार मानले. सकाळच्या सत्रात असुंता पारधे, अॅड. स्मिता सरोदे, प्रा. रूपाताई कुलकर्णी, प्रा. आनंद पवार, वासंती दिघे यांनी विविध विषयांवर मांडणी केली. या चर्चासत्रात १०० पेक्षा अधिक जण सहभागी झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2014 रोजी प्रकाशित
महिलांसाठी देश सुरक्षित करण्याची गरज
महिलांसाठी भारत सुरक्षित करण्याचा एकमुखी ठराव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत संमत करण्यात आला.
First published on: 01-02-2014 at 02:38 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We must make our women safe and secure