सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात १५० वर्षांनंतर आज महिलांची स्थिती लक्षणीय सुधारली आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांतही महिला आत्मविश्वासाने वावरू लागल्या आहेत हेसुद्धा आता समाजाच्या पचनी पडू लागलं आहे. तरीही सहजी कल्पनाही करता येणार नाही, असे व्यवसाय महिला यशस्वीपणे करताहेत हे पाहिले की चटकन मान वळवून बघितले जाते. देशातील पहिल्या मोनोरेलचे पहिले सारथ्य, विजेच्या खांबांवर चढणारी ‘वायरवुमन’, स्वैपाकघरात वावरत असतानाच थेट शेअर बाजारात ‘ट्रेडिंग’ या घटना अजूनही आपल्याला सुखद धक्का देऊन जातात. महिला दिनाच्या निमित्ताने आगळी मुलुखगिरी करणाऱ्या या कन्यांचा परिचय. ‘महिला राज’ आल्यास भ्रष्टाचार कमी होईल, असा आशावाद वर्तवला जातो. परंतु काळ पुढे सरकत चालला आहे तशी महिला गुन्हेगारांची संख्या वाढत चालली आहे, ही गोष्टसुद्धा एका अर्थी ‘लक्षणीय’च म्हणावी लागेल. महिला दिनी या प्रक्रियेवरही विचार होणे आवश्यक आहे.

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगास उद्धारी’ असे ज्यांच्या बाबतीत म्हटले जाते, त्या महिलांच्या हाती जगातील अनेक देशांनी आपली सुरक्षा बिनदिक्कतपणे सोपविली आहे. सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असून १९ वर्षांनंतर प्रथमच नवी मुंबईतील दोन प्रमुख पोलीस ठाण्याची जबाबदारी दोन महिलांवर सोपविण्यात आली असून, तेथील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षमपणे आम्ही सांभाळून दाखवू, असा ठाम विश्वास त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्ताने व्यक्त केला आहे.
वाहतूक शाखेत आमूलाग्र बदल करणाऱ्या माया मोरे यांना नवीन पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी नुकतीच नवी मुंबईतील पहिले औद्योगिक वसाहतीतील पोलीस ठाण्याची जबाबदारी दिली आहे, तर सायबर गुन्ह्य़ांची उकल करण्यात हातखंडा असणाऱ्या संगीता शिंदे आल्फान्सो यांना उच्चभ्रू लोकवस्ती असणाऱ्या नेरुळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार देण्यात आला आहे. दोन्ही महिला पोलीस अधिकारी या सक्षम आणि तेवढय़ाच कणखर म्हणून ओळखल्या जात असून त्यांनी यापूर्वीच्या कामात आपला ठसा उमटविला आहे. दोघींनी मुंबईत बराच काळ सेवा पूर्ण केली असून मोरे यांनी विमानतळाची सुरक्षा सांभाळलेली आहे, तर शिंदे यांना पुण्यात झालेल्या कॉमनवेल्थ गेमची संपूर्ण सुरक्षा सांभाळण्याचा अनुभव गाठीशी आहे. वाशी येथे जेष्ठ नागरिकाने आपल्याच पत्नीचा शांतपणे केलेला खून शिंदे यांनी केलेल्या चतुरस्र तपासामुळे जनतेसमोर येऊ शकला आहे. मोरे यांनी प्रवाशांना नाडणाऱ्या रिक्षाचालकांना धडा शिकविण्यासाठी सुमारे ४० हजार केसेस करून एक शिस्त आणण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शाळा, महाविद्यालयात सुरक्षा सप्ताहविषयी जनजागृती करण्याची मोरे यांनी आपला वसा आजही जपला आहे. नवी मुंबईतील पहिले औद्योगिक वसाहत पोलीस ठाणे म्हणून सुरू झालेल्या रबाले एमआयडीसीची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्या स्वत: एक उत्तम खेळाडू आहेत. हे आव्हान आपण पेलणार असे त्यांनी स्पष्ट सांगितले. महिला सुरक्षेविषयी वेगवेगळ्या उपाययोजना करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सायबर गुन्ह्य़ांकडे विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. त्यामुळे १९ वर्षांने दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांना स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली असून ही मोरे, शिंदे महिला जोडी नवी मुंबईतील गुन्हेगारांना वठणीवर आणणार असे दिसून येत आहे.