वडवणी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने वागावे व तालुक्यातील २० विहिरींची कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत. अशी सूचना जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी दिली आहे.
बुधवारी (दि. ३) जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी वडवणी येथे अचानक भेट दिली. जिल्हाधिकारी आल्याचे समजताच नागरिकांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेऊन समस्या मांडल्या. या वेळी केंद्रेकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून जबाबदारीने कामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  वडवणी तालुक्यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत २० विहिरी मंजूर असून त्या ठिकाणी अगोदर १०० फूट बोअर घेऊन पाण्याची चाचपणी करावी व पाणी असेल तर लागलीच विहिरीचे काम तात्काळ सुरू करावे, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. तालुक्यातील नालाबंडिंगची कामे, तलावातील गाळ काढण्याची कामे तात्काळ करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या वेळी नागरिकांच्या विविध प्रश्नांचे निरसनही त्यांनी केले.