यंदा पावसाच्या लहरीपणाचा परिणाम रब्बी हंगामातील पेरण्यांवरही जाणवत असून अमरावती विभागात आतापर्यंत ५० टक्के क्षेत्रातच पेरण्या आटोपल्या आहेत. यंदा हरभरा लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण ६२.८ टक्केच क्षेत्र हरभरा पिकाने व्यापले आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील सरासरी लागवडीखालील क्षेत्र ५ लाख ९२ हजार हेक्टर असून आतापर्यंत २ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
खरीप हंगामाला पावसाच्या अनियमिततेचा फटका बसला. त्यामुळे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची मदार होती, पण अनेक भागात जमिनीत ओलावा आणि सिंचनाच्या पुरेशा सोयी नसल्याने शेतकऱ्यांनी रब्बीत लागवड करण्यात फारसा उत्साह दाखवलेला नाही. जमिनीत ओल चांगली असल्यास हरभरा पिकाच्या लागवडीला कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जाते. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचा पेरा वाढला होता, पण यंदा मात्र तसे चित्र नाही. विभागातील पाच जिल्ह्यात हरभरा लागवडीचे सरासरी क्षेत्र २ लाख ५६ हजार हेक्टर असून त्यापैकी ६२.८ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ७८ टक्के क्षेत्रात हरभऱ्याचा पेरा झाला आहे. वाशीम जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच क्षेत्रात हरभऱ्याचे पीक आहे. रब्बी हंगामातील ज्वारीचे क्षेत्रही घटल्याचे चित्र असून विभागात ६० टक्के क्षेत्रातच आतापर्यंत ज्वारीचा पेरा आटोपला आहे. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ८५ टक्के क्षेत्रात ज्वारी पेरण्यात आली आहे, इतर जिल्ह्यांमध्ये मात्र ज्वारीची लागवड कमी आहे. गहू पिकाखाली आतापर्यंत २८ टक्के क्षेत्र आले आहे. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांचा कल गहू लागवडीकडे असला, तरी गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याला पाणी कमी लागते. ज्या भागात कालव्याचे पाणी पोहोचले आहे, त्या भागात गव्हाला अधिक पसंती आहे.
अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला, पण रब्बी हंगामात खरिपातील आर्थिक तूट भरून काढण्याची संधीही निसर्गाने हिसकावून घेतली. गेल्या वर्षीच्या हंगामात गहू, हरभरा, भुईमूग, कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेण्यात आले होते, पण यावर्षी परिस्थितीने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकले आहे. बुलढाणा जिल्ह्यात सरासरी लागवडीखालील १ लाख ५२ हजार हेक्टरपैकी आतापर्यंत ९३ हजार ७०७ हेक्टरमध्ये (६२ टक्के) रब्बीचा पेरा झाला आहे. अकोला जिल्ह्यात सरासरी १ लाख १५ हजार हेक्टरपैकी ४२ हजार (३७ टक्के), वाशीम जिल्ह्यात ८९ हजार हेक्टरपैकी २८ हजार (३२ टक्के), अमरावती जिल्ह्यात १ लाख ४७ हजार हेक्टरपैकी ८६ हजार (५८ टक्के), तर यवतमाळ जिल्ह्यातील सरासरी लागवडीच्या ८७ हजार हेक्टरच्या तुलनेत ४४ हजार हेक्टर (५० टक्के) क्षेत्रात पेरणी झाली आहे.
जलपातळीही घसरलेलीच
विभागातील जलाशयांमधील पाण्याची पातळी कमालीची घसरली आहे. विहिरींची जलपातळी हिवाळ्यातच धीर सोडू पाहत असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट आहे. जमिनीत ओलच नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळले आहे, तर ज्यांनी लागवड केली त्यांच्यासमोर सिंचनाचा प्रश्न आहे. विभागातील लघु प्रकल्पांमध्येही पाणीसाठा कमी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Dec 2014 रोजी प्रकाशित
पश्चिम विदर्भात रब्बीचा पेऱ्यात घट!
यंदा पावसाच्या लहरीपणाचा परिणाम रब्बी हंगामातील पेरण्यांवरही जाणवत असून अमरावती विभागात आतापर्यंत ५० टक्के क्षेत्रातच पेरण्या
First published on: 09-12-2014 at 07:28 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West regions decreased rabbisow