मुख्यमंत्र्यांना नेमके काय म्हणायचे आहे?

उपराजधानीतील गुन्हेगारीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीच्या सरकारवर ठेवलेला ठपका हा शुद्ध कांगावा आहे.

उपराजधानीतील गुन्हेगारीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीच्या सरकारवर ठेवलेला ठपका हा शुद्ध कांगावा आहे. गेल्या पाच महिन्यात या शहरात गुन्हेगारीने कळस गाठलेला असताना सुद्धा सत्तेत असलेले फडणवीस अजूनही काँग्रेसवर दोष ढकलून नेमका कोणता संदेश नागपूरकरांना देत आहेत, हा भयभीत झालेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार नाही का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
येथील कारागृहातून कैदी पळून जाणे आणि त्याच दिवशी शहरात गोळीबार व इतर गुन्हेगारीच्या पाच घटना घडल्याने विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्र्यांच्या शहराला गुन्हेगारांची राजधानी, असे संबोधण्यात आले. या टीकेला उत्तर देताना फडणवीसांनी ‘जेलब्रेक’च्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी जाहीर केली. यावेळी भाष्य करताना गृहखाते असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या शहरातील गुन्हेगारीविषयी जी विधाने केली आहेत ती पूर्णपणे जनतेची दिशाभूल करणारी आहेत. या शहरातील काही गुंडांवर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई केली होती, पण आधीच्या काँग्रेस सरकारने त्याचा आढावा घेताना ती रद्द केली. त्यामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. मुळात हे म्हणणेच शुद्ध कांगावा असून सत्ता हाती आल्यानंतर गेल्या पाच महिन्यात गुन्हेगारी नियंत्रणाच्या मुद्यावर आलेले अपयश लपवण्याचा प्रकार आहे.
सामान्य जनतेशी फटकून वागणारे व अजिबात संवाद न ठेवणारे के.के. पाठक येथे आयुक्त म्हणून आल्यापासून या शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत गेला. पाठक यांची नेमणूक काँग्रेसच्या कार्यकाळात झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत असताना सुद्धा या शहरात गुंडांचा धुमाकूळ कायम होता. आधीच्या सरकारच्या काळात काही गुंडांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई झाली व ती सरकारी पातळीवरून मागे घेण्यात आली, हे खरे असेलही, पण गेल्या पाच महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या येथील पोलिसांनी नेमक्या किती गुंडांवर याच कायद्यान्वये कारवाई करून तुरुंगात डांबले, या प्रश्नाचे उत्तर कुणी द्यायला तयार नाही. अशी कारवाई झालेल्या गुंडांची संख्या दोन आकडी सुद्धा नाही, असे पोलिसांचा रेकॉर्ड सांगतो. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या शहरात गंभीर गुन्ह्य़ांची मालिकाच सुरू झाली. खुद्द त्यांच्या घराजवळ भरदिवसा गोळीबार व खून झाले. सामूहिक बलात्कार, लहान मुलांचे अपहरण, खून, छेडखानी, टोळीयुद्धाचे प्रकार वेगाने वाढले. सुपारी घेऊन खून करण्याच्या प्रकारात वाढ झाली. व्यापारी वस्ती असलेले जरीपटका तर गुंडांचे नंदनवन झाले. गुंडांना मोकळे रान मिळाले. कारण, पोलिसांचा धाकच उरला नाही.
या स्वत:च्या कार्यकाळातील गुन्हेगारीवर फडणवीस अजिबात भाष्य करीत नाहीत. उलट, या सर्व प्रकरणात आरोपींना अटक झाली, असे विधान करतात. हा प्रकार अपयशी पोलिसांची बाजू सावरून घेण्याचाच आहे. गुन्हा घडल्यावर तत्परतेने आरोपी पकडणारे पोलीस कार्यक्षम, अशी व्याख्या मुख्यमंत्र्यांना अपेक्षित आहे की गुन्हेच घडू न देणारे पोलीस कार्यक्षम, असे त्यांना म्हणायचे आहे, हेही एकदा स्पष्ट होणे गरजेचे आहे. गुन्हेगारी नियंत्रणात येथील पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले, हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ असताना या पोलिसांना पाठीशी घालण्याचे काम फडणवीस का करीत आहेत, असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे. ज्या ‘जेलब्रेक’मुळे राज्याची नाचक्की झाली त्याच कारागृहात बंद असलेल्या एका कुख्यात गुंडाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजपचे आमदार गेले होते. भाजप आमदाराच्या विजयी मिरवणुकीत कुख्यात गुंड सहभागी झाल्याची छायाचित्रे नागपूरकरांच्या आठवणीत अजून कायम आहेत. या गुंडांना राजकीय आश्रय कुणाकडून आहे, या प्रश्नाचे उत्तर सर्वाना ठावूक असताना मुख्यमंत्री पाच महिने सत्तेत राहून सुद्धा काँग्रेसला दोष देत असतील तर या शहरातील गुंडांनी आनंदोत्सव साजरा करायला काहीच हरकत नाही.
या शहरातले पोलीस चोरून लपून अनैतिक व्यापार करणारे व अटक झाल्यावर मान खाली घालून व बुरखे चेहऱ्यावर घेऊन चालणाऱ्या पांढरपेशा गुन्हेगारांना पकडण्यात मर्दूमकी दाखवतात, पण अटक केल्यावरही ताठ मानेने व मुजोरी करत वागणाऱ्या गुंडांना मात्र पकडत नाहीत. अशा पोलिसांची बाजू घेत व अपयशी ठरलेल्या पाठकांना अभय देत मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता संदेश जनतेला द्यायचा आहे, हेही एकदा स्पष्ट व्हायला हवे. भरदिवसा गोळीबाराच्या घटना नियमित अंतराने घडणारे हे राज्यातले एकमेव शहर ठरले आहे, याची जाणीव जनतेला आहे. ती राज्यकर्त्यांना कधी येणार, हा खरा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरातील जरीपटक्याचे नागरिक गुंडांपासून संरक्षण व्हावे म्हणून लाठय़ा हाती घेतात. त्यांचा पोलिसांवरचा विश्वास उडतो. ही एकमेव घटना राज्यकर्त्यांचे अपयश ठळकपणे स्पष्ट करणारी आहे.
देवेंद्र गावंडे, नागपूर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: What exactly chief ministers devendra fadnavis want to say on nagpur crime