सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती असून बुलडाणा जिल्हाही यातून सुटला नाही. जिल्ह्यात मागेल त्याला पाणी, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मागेल त्याला काम देण्याचे धोरण शासनाने राबविणे सुरू केले आहे व तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पैशाची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.  
आज खामगाव येथे आयोजित कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय अंभोरे, तर मंचावर आमदार दिलीप सानंदा, आमदार राहुल बोंद्रे, जि.प. अध्यक्षा वर्षांताई वनारे, हर्षवर्धन सपकाळ, तबस्सुम हुसेन, जयश्रीताई शेळके, अलकादेवी सानंदा, माजी नगराध्यक्षा सरस्वती खासणे, कृउबास सभापती राजाराम काळणे, पं.स. सभापती सतीश चव्हाण, सोपानराव गाडेकर, जि.प. सदस्य सुरेश तोमर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी थोरात म्हणाले की, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने अडीचशे जनावरांचा कळप जेथे असेल तेथे छावणी उभारून त्यांना चारा पाणी तात्काळ दिल्या जाईल. १० माणसांनी एकत्रित येऊन काम मागितले तर दुसऱ्याच दिवशी तात्काळ रोजगार हमी योजनेच्या कामास सुरुवात करून रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मागेल त्या गावाला पाणी पुरवठा तात्काळ करण्यात येईल व या बाबतीत सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत, परंतु जे अधिकारी दुष्काळी परिस्थितीबाबत गंभीर नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी शेवटी दिला आहे. कॉंग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे अध्यक्षीय भाषणातून विजय अंभोरे यांनी सांगितले. जि.प. अध्यक्षा वर्षांताई वनारे, आमदार सानंदा, आमदार राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहरयारखान मास्टर, तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे यांनी केले. तत्पूर्वी, खामगाव शहरात प्रशासकीय इमारत व इतर विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचे कार्यक्रम मंत्री महोदयांच्या हस्ते पार पडले.