विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना सुरक्षेच्या आणि कायदा सुव्यवस्थेच्या पाश्र्वभूमीवर विजयी मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे. पोलीस परवानगीनंतर नवनिर्वाचित आमदाराला मिरवणूक काढता येणार आहे. यामुळे जल्लोष साजरा करण्यासाठी तयारीत असलेल्या उमेदवाराला आणि कार्यकर्त्यांना काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी गावगुंडांच्या आवळलेल्या मुसक्या, नाकाबंदीतून जप्त केलेली रोकड आणि शहरात निर्भय वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने पोलीस संचलन यामुळे मतदारांनीदेखील मतदानात उत्साह दाखवला होता. लोकसभा निवडणुकीपासून ते आताच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत साप्ताहिक रजाही न घेता अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे नवी मुंबईत निर्भय वातावरणात निवडणूक पार पडली. मतमोजणाच्या दिवशी कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊन गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या होत्या.
वाशीतील सिक्रेट हाट मतमोजणी केंद्राजवळ प्रत्येक पक्ष कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्रपणे उभे राहण्याची सोय करण्यात आली होती. केंद्राच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव बलाचे जवान तैनात करण्यात आले होते. यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. तसेच केंद्राजवळ फटाके आणि ढोल-ताशे नेण्यास मज्जाव करण्यात आला होता. निकाल स्पष्ट होत असताना संभाव्य विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची गर्दी त्या ठिकाणी वाढत होती. त्याचप्रमाणे पोलिसांच्या नजरा चुकवून काही उत्साही कार्यकर्त्यांनी निकालानंतर फटाके आणि ढोल वाजवून आनंद साजरा केला. महत्त्वाचे म्हणजे मतमोजणी केंद्र असलेला परिसर हा शांतता क्षेत्र (सायलेन्स झोन) असल्याने या कार्यकर्त्यांवर पोलीस काय कारवाई करणार आहे याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेला दिवाळी सण, सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उभे राहू नये या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी विजयी उमेदवारांना विजयी मिरवणूक काढण्यास मनाई केली आहे. मिरवणूक काढण्यासाठी पोलीस परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र परिस्थिती पाहूनच मिरवणुकीला पोलिसांकडून  परवानगी मिळणार असल्याने विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे.  

सुरक्षिततेच्या दृष्टीने मिरवणूक न काढण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे परवानगी घेऊनच मिरवणूक काढता येणार आहे. मात्र परवानगी देताना परिस्थिती पाहूनच देण्यात येणार आहे.
-फत्तेसिंग पाटील,  अपर पोलीस आयुक्त, नवी मुंबई</strong>