सहकारी संस्थांची सुरूवातीच्या काळात सकारात्मक व गुणात्मक वाढ झाली, पुढे फक्त संख्यात्मक वाढ होत गेली. आज या सहकारी संस्थांनी जागतिक स्पध्रेचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी संस्थेतल्या प्रत्येकाने नवनवीन ज्ञान आत्मसात करायला हवे, तरच स्पध्रेच्या कालचक्रात संस्था टिकतील. व्यवस्थापन शास्त्राच्या अभावामुळे सहकारी संस्था डबघाईला आल्या, म्हणूनच कारणांचा शोध आणि बोध घेऊन व्यवस्थापन शास्त्राचे ज्ञान आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन, शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अभ्यासक डॉ. व्ही. एस. पाटील यांनी केले.
कराड तालुक्यातील उंडाळे येथे कै. स्वातंत्र्यसैनिक श्यामराव पाटील नागरी पतसंस्थेच्यावतीने आयोजित स्वातंत्र्यसैनिक श्यामराव पाटील यांचा पुण्यतिथी सोहळा, सभासद मेळावा व दिनदर्शिका प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर होते. या वेळी संस्थेचे मार्गदर्शक जयसिंग पाटील, उपनिबंधक अविनाश देशमुख, संस्थेचे अध्यक्ष आर. डी. थोरात उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले की, शंभरहून अधिक वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या सहकारी संस्थांचे ग्रामीण अर्थकारणातील योगदान मोलाचे आहे. सहकार चळवळ आर्थिक व सामाजिक उन्नतीची चळवळ आहे. या चळवळीत योगदान देणाऱ्या थोर पुरुषांच्या प्रतिमा पूजनापेक्षा त्यांच्या विचारांचे संवर्धन संस्था चालकांनी करावे. कोणाच्या साम्राज्यासाठी नव्हे तर समाजाच्या उत्कर्षसाठी सहकारी संस्था स्थापन झाल्या आहेत, याचे भान ठेवून काम करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
उंडाळकर म्हणाले की, सहकारी चळवळ दिशाहीन बनत चालली आहे. ज्या उद्देशाने सहकारी चळवळीचा उदय झाला, त्या उद्देशालाच बगल दिल्यामुळे सहकारात विदारक चित्र निर्माण झाले आहे. सहकारातील प्रत्येकाने विश्वस्त या नात्याने विश्वासाची, सामाजिक बांधिलकीची भूमिका बजावली तरच सहकारी संस्था लोकाभिमुख बनतील. राजकारणासाठी सहकारी संस्थांत शिरकाव करणाऱ्या प्रवृत्तींना रोखून सहकारी संस्थांच्या निकोप वाढीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
अविनाश देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आर. डी. थोरात यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या रोहिणी जंगम, पंचायत समिती सदस्य अॅड. आनंदराव पाटील, राजश्री थोरात, सरपंच नंदाताई शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, संचालक, सेवक उपस्थित होते.