पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून नवजात बालक पळवण्यात आल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी उमटले. अतिरिक्त आयुक्त प्रकाश कदम यांनी सकाळीच रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेची माहिती घेत सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले. दुपारी स्थायी समितीच्या बैठकीत याच विषयावरून प्रशासनाला सदस्यांनी धारेवर धरले. अखेर, या घटनेच्या वेळी कामावर असलेल्या मात्र वेळेपूर्वीच निघून गेलेल्या महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, बाळ घेऊन ‘पोबारा’ केलेल्या अज्ञात महिलेचा शोध सुरूच आहे.
खेड पिंपळगावच्या एका महिलेच्या नवजात बालकाला घेऊन सोमवारी दुपारी एका महिलेने पोबारा केला. मात्र, रुग्णालयातील सीसीटीव्हीत त्या महिलेच्या सर्व हालचाली कैद झाल्या.  या घटनेची दखल घेत प्रकाश कदम यांनी  रुग्णालय गाठले व तेथील सुरक्षा यंत्रणेची माहिती घेतली. मुख्य प्रवेशद्वाराजवळ सीसीटीव्ही बसवण्याचे व यापुढे प्रसूतिगृहात प्रवेश करताना नोंद सक्तीची करण्याचे आदेश त्यांनी दिले. स्थायी समितीच्या बैठकीत चंद्रकांता सोनकांबळे यांनी हा विषय उपस्थित केला. मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आशा सपकाळ या सुरक्षा कर्मचाऱ्यास निलंबित केल्याची माहिती दिली.