दैनंदिन गरजा भागविताना आयुष्याशी दोन हात सारेच करतात. मात्र रोजीरोटीच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने अन्याय, अत्याचाराविरूध्द आवाज उठविणाऱ्या महिलांचा संघर्ष ठाणे येथील फोटो सर्कल सोसायटीच्या माध्यमातून नाशिककरांना अनुभवता येणार आहे. कुसुमाग्रज स्मारकात ४ ते ६ एप्रिल या कालावधीत ‘विद्युल्लता’ छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून देशातील ३१ महिलांचा परिचय करून देण्यात येणार आहे. या शिवाय, भटंकतीदरम्यान आलेले अनुभव सांगणारा ‘शोध विद्युल्लतांचा’ हा कार्यक्रम ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन ४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नगरसेविका सीमा हिरे, पत्रकार वंदना अत्रे यांच्या उपस्थित होणार आहे. ठाणे येथील फोटो सर्कल सोसायटीच्या ५४ महिला छायाचित्रकार सदस्या आहेत. त्यापैकी १८ सदस्यांनी यंदाच्या ‘विद्युल्लता’ महाराष्ट्र आणि पूर्वाचल येथील ३१ महिलांच्या विशेष कामगिरीची छायाचित्रे काढली आहेत. त्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणे, नगर, जळगाव, नाशिक, पेण येथील १७ कर्तृत्ववान महिलांची आणि पूर्वाचलमधील आसाम, अरूणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर या राज्यातील १४ महिलांच्या कामगिरीची छायाचित्रे पहायला मिळणार आहेत. पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर, लेखिका-कवयित्री आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या आयुक्त नीला सत्यनारायण, नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकर, एड्सबाधीत मुले-स्त्रीयांना आधार देणाऱ्या आणि वेश्यांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या नगरच्या प्राजक्ता कुलकर्णी, नाशिक येथील स्मशानभूमीत काम करणाऱ्या सुनीता पाटील, महिलांना स्वयंरोजगारातून स्वयंपूर्णतकडे नेणाऱ्या पेणच्या अहिल्या मंडळ आदी महिलांची ओळख प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे.
अरूणाचल प्रदेशातून मुले आणि स्त्रीया यांचे अपहरण होऊ नये म्हणून काम करणाऱ्या बिन्नी यांगा, अंमली पदार्थाच्या विरोधात मोहीम राबविणाऱ्या आईनी ताहोल, मणिपूर सेंद्रीय शेतीचे राज्य बनविण्याचे काम करणाऱ्या समाज सेविका ओ इंदिरा ओईनाम, आसाममध्ये काळ्या जादूच्या विरोधात काम करणाऱ्या बिरूबाला राभा यांची विशेष कामगिरी या प्रदर्शनातील  छायाचित्राद्वारे पहायला मिळणार आहे. कार्य कर्तृत्वाचा परिचय व्हावा, यासाठी इंग्रजीतून पुस्तिकाही प्रकाशित केलेली आहे.  
तसेच, या भटकंतीत महिला छायाचित्रकारांना आलेले अनुभव, त्या विद्युल्लतांचा परिचय त्यांचे कार्य या बाबत ‘शोध विद्युल्लतांचा’ हा अनुभव कथनाचा कार्यक्रम ५ एप्रिल रोजी कुसुमाग्रज स्मारकच्या मुक्तायन सभागृहात होईल. प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत खुले असून नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.