गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या बालिकाश्रम रस्त्याच्या कामास अखेर नववर्षांनिमित्त मुहूर्त लागला असून नगरोत्थान योजनेतून हाती घेतलेल्या सुमारे २० कोटींच्या या रस्त्याच्या कामास उद्या प्रारंभ होत आहे. या निमित्ताने मनपाच्या कार्यक्रमात प्रथमच आमदार-खासदार असा मेळ घालण्यात आला आहे. शिवाय कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी व राष्ट्रवादी यांच्यात श्रेयाचीही स्पर्धा रंगली.
उद्या (बुधवार) सायंकाळी ५ वाजता खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आमदार अनिल राठोड यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामास प्रारंभ होईल. यावेळी महापौर शीला शिंदे, जिल्हाधिकारी संजीवकुमार, आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त महेश डोईभोडे, आमदार राम शिंदे, अरूण जगताप, र्मचट बँकेचे अध्यक्ष हस्तिमल मुनोत, सेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, उपमहापौर गितांजली काळे, स्थायीचे सभापती बाबासाहेब वाकळे, सभागृहनेते अशोक बडे, विरोधी पक्षनेते विनित पाऊबुद्धे, तसेच सेना-भाजपचे नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांमध्ये समावेश असलेल्या बालिकाश्रम रस्त्याचे नूतनीकरण विविध कारणांनी लांबले. रस्त्याचे रूंदीकरण होऊन दोन वर्षे झाली, मात्र पुढच्या कामाला मुहूर्त लागत नव्हता. उद्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होत असताना सत्ताधाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या, तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी माजी महापौर संग्राम जगताप यांना या कामाचे श्रेय देण्याचा प्रयत्न चालवला आहे. स्थानिक वर्तमानपत्रात तशा मोठय़ा जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. या ना त्या कारणाने बहुचर्चित राहिलेला हा रस्ता या कार्यक्रमाच्या निमित्तानेही पुन्हा चर्चेचा विषय बनला.