येथील महाऔष्णिक वीज केंद्रातील क्रशर हाऊसमध्ये कन्व्हेअर बेल्टमध्ये सापडलेल्या रमेश धानोरकर (४८) या कंत्राटी कामगाराचा काल गुरुवारी सकाळी दहा वाजता घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात कंत्राटदार व अभियंत्यांच्या चुकीमुळे झाल्याने मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी कामगारांनी लावून धरली आहे.
येथील महाऔष्णिक वीज केंद्रातील पाचशे मेगाव्ॉटच्या संचालगत क्रशर हाऊस आहे. यात काम करतांना संबंधित विभागाच्या अभियंत्याकडून परवानगी घ्यावी लागते. एकदा परवानगी घेतली की, कोळसा बारीक करणारा कव्हेअर बेल्ट बंद करून कामाला सुरुवात केली जाते. गुरुवारी सकाळी एम.एन.पाटील या कंपनीचे कंत्राटी कामगार केबल जोडण्याच्या कामासाठी म्हणून क्रशर हाऊसमध्ये गेले. यावेळी एम.एन.पाटील कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित अभियंत्याकडून परवानगी घेतली नाही आणि थेट केबल जोडण्याच्या कामाला सुरुवात केली. हे काम सुरू होते तेव्हा रमेश धानोरकर हा कंत्राटी कामगार कन्व्हेअर बेल्टवर काम करीत होता.
नेमके त्याच वेळी क्रशन हाऊसमध्ये काम करणारे अभियंते आले आणि कन्व्हेअर बेल्ट सुरू केला. बेल्ट सुरू होताच कामगार रमेश धानोरकर त्यात दबले गेले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अभियंता व वीज केंद्राचे जनसंपर्क अधिकारी मसराम यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. ही बाब लक्षात येताच अभियंते व कामगारांनी धावाधाव करून बेल्ट बंद केला, परंतु तोपर्यंत उशिर झाला होता. या घटनेनंतर सर्व कंत्राटी कामगारांनी घोषणाबाजी सुरू केली. मृत कामगाराच्या कुटुंबीयाला मदत द्या अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा दिला. मृताच्या कुटुंबीयाला मदतीचे आश्वासन मिळाल्यानंतर तणाव निवळला. दरम्यान, या अपघाताची नोंद दुर्गापूर पोलिसांनी घेतली आहे. मृत कामगार हा एम.एन. पाटील या कंपनीचा असून या कंपनीचे काम अतिशय निष्काळजीपणाने सुरू असल्याची माहिती येथील काही कंत्राटी कामगारांनी दिली.