काही शब्द लिहायचे असतील, तर आपण कागद, शाई, पेन याचा विचार करू. पण गजेंद्र सूर्यकांत वाढोणकरांना लिहिण्यासाठी तांदूळ, तीळ आणि मोहरी असे धान्यही पुरते. २४७२ तांदळावर शीख धर्मीयांचा पवित्र ‘श्री सुखमणीसाहिब’ हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. आता त्यांनी ‘साईचरित्र’ ग्रंथाचे लिखाण याच साहित्याच्या आधारे पूर्ण करण्याचे ठरविले आहे. येत्या दीड वर्षांत हा ग्रंथ तांदळावर लिहून पूर्ण केल्यानंतर ती प्रत साईबाबांच्या चरणी अर्पण करेपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
२००८ मध्ये गुरू-ता-गद्दी सोहळ्याच्या निमित्ताने ‘श्री सुखमणीसाहिब’ हा ग्रंथ त्यांनी लिहायला घेतला. कलाकुसर करतानाची बारकाई आणि वेगवेगळ्या लिपीत लिहिण्याचे कौशल्य निश्चितपणे वाखाणण्याजोगे आहे. ते पंजाबी, मराठी, तामिळ, संस्कृत, बंगाली, उर्दू लिपीमध्ये तांदळावर लिहू शकतात. केवळ लिपीच नाही तर तीळ, मोहरी आणि तांदळापासून ते वेगवेगळी चित्रेही रेखाटतात. एखादी व्यक्तीचे रेखांकनही ते तांदळावर करून दाखवतात. तेदेखील काही मिनिटात. शीख धर्मीयांचा ग्रंथ तांदळावर लिहिल्याने पंजाब सरकार व सुवर्णमंदिराच्या विश्वस्तांनी त्यांचा सन्मान केला. वेगवेगळ्या १४ देशांमध्ये त्यांचे दौरे झाले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वतीने भारत भेटीस आलेल्या बराक ओबामा यांनाही अशी तांदळावर केलेली कलाकृती भेट देण्यात आली होती. आता ‘साईचरित्र’चे लिखाण त्यांनी हाती घेतले आहे. हा संपूर्ण ग्रंथ ७५८ पानांचा असून ७२ ते ७५ लाख तांदळांवर तो लिहिण्याचे त्यांनी ठरविले आहे. येत्या दीड वर्षांत हा ग्रंथ लिहून पूर्ण होईल, असे गजेंद्र वाढोणकर यांनी सोमवारी सांगितले. सकाळी साडेसहा ते रात्री ८ वाजेपर्यंत सतत लिखाण केले तरच हे काम पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. त्यांना या कामासाठी माजी खासदार उत्तमसिंग पवार गरवारे पॉलिस्टरचे संचालक अनिल भालेराव आदींची मदत होते.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2012 रोजी प्रकाशित
७२ लाख तांदळावर ‘साईचरित्र लिहिण्याचा मानस!
काही शब्द लिहायचे असतील, तर आपण कागद, शाई, पेन याचा विचार करू. पण गजेंद्र सूर्यकांत वाढोणकरांना लिहिण्यासाठी तांदूळ, तीळ आणि मोहरी असे धान्यही पुरते. २४७२ तांदळावर शीख धर्मीयांचा पवित्र ‘श्री सुखमणीसाहिब’ हा ग्रंथ लिहून पूर्ण केला.

First published on: 25-12-2012 at 02:51 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wrote sai charitra on 72 lakhs rice