* देवेंद्र फडणवीसांना पहिला हादरा
* संघटन कौशल्याची अग्निपरीक्षा
यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार नंदिनी पारवेकर यांचा सहानुभूतीच्या लाटेवर झालेला अपेक्षित विजय भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना पहिला हादरा देणारा ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन महिनाही होत नाही तोच यवतमाळच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर येऊन पडली होती. फडणवीसांच्या नेतृत्त्वाची पहिली कसोटी यानिमित्ताने लागली असल्याने साऱ्यांचेच निकालाकडे लक्ष होते. परंतु, भाजप उमेदवार मदन येरावार पराभूत झाल्याने पराभवाची अप्रत्यक्ष जबाबदारी फडणवीसांवर येऊन पडली आहे.
यवतमाळच्या निवडणुकीकडे काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर विरुद्ध भाजपचे मदन येरावार अशा नजरेतून पाहण्यापेक्षा ही लढत काँग्रेसचे मुरब्बी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि तरण्या फडणवीस यांच्यातील असल्याचे चित्र रंगविण्यात आले होते. त्यामुळे मदन येरावार यांच्या प्रचारासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. भाजपने नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची फौजच येरावार यांच्या प्रचाराला भिडवली होती. काँग्रेसच्या धोरणांना भाजपने लक्ष्य बनविले होते. मात्र, ही पोटनिवडणूक अत्यंत उच्च पातळीवर लढली गेली. कोणत्याही वैयक्तिक पातळीवरील आरोप-प्रत्यारोपांना नेत्यांनी फाटा दिला. यात माणिकरावांच्या अनुभवी राजकीय रणनितीचा विजय झाला.
काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यापासून स्थानिक पातळीवरील काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया यांनीही जोरदार मोर्चेबांधणी करून विजय खेचून आणला. निवडणूक माणिकराव ठाकरे यांच्यासाठीही अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. नंदिनी  पारवेकरांचा पराभव झाला असता तर ठाकरे यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून गच्छंती अटळ होती, ही बाब खुद्द ठाकरे यांनी मान्य केली आहे. नंदिनी पारवेकरांच्या विजयामुळे ठाकरे यांचे पद आता अढळ झाल्याचे समजले जाते. कारण, माणिकरावांना त्यांचा पुत्र राहुल याला २०१४ ची विधानसभा निवडणूक लढायची असल्याने नंदिनीचा पराभव त्यांना हवा असल्याचा अप्रचार झाला होता. काँग्रेस जर एकसंघ राहिल्याने विजयाचे पारडे काँग्रेसच्या बाजूने झुकले. परंतु, काँग्रेसचे उपाध्यक्ष व युवा नेते राहुल गांधींच्या मराठवाडा दौऱ्यापासून दूर राहिलेले राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा टीकेचे धनी झालेले असतानाच आता त्यांचे थोरले बंधू व काँग्रेसचे खासदार विजय दर्डासुद्धा येथील पोटनिवडणुकीपासून दूर राहिल्याची बाब चर्चेचा विषय ठरली आहे.
सहानुभूतीची लाट आणि पारंपरिक मतांच्या जोरावर काँग्रेसला विजय मिळाला असला तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवून देण्याच्या दृष्टीने फडणवीस यांना राज्यव्यापी पक्षबांधणी करावी लागणार असून यवतमाळच्या पराभवातून बरेच काही शिकावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया अंतस्थ गोटातून उमटली आहे. यवतमाळ जिंकणे भाजपसाठी सोपे मुळीच नव्हते. प्रचारसभांमधून भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठवूनही नंदिनी पारवेकरांचा विजय भाजप नेत्यांना रोखता आला नाही. याचे परीक्षण देवेंद्र फडणवीसांना करावे लागणार आहे. यवतमाळात भाजप उमेदवाराचा ‘निकाल’ लागत असताना फडणवीस मुंबईत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दीड तास होते.