शहराकडे येत असलेल्या मोटारसायकलस्वारास अ‍ॅपे ऑटोने कट मारल्याने त्यावरील २४ वर्षीय युवक खाली कोसळला, पण तेवढय़ात मागून भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरखाली तो चिरडल्याने जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी रात्री ७.३० वाजताचे दरम्यान पुसद रोडवरील बेलखेड दहगाव शिवारात घडली. अमोल रमेशराव चव्हाण (रा. जुनना) असे या अपघातात मृत पावलेल्या युवकाचे नाव असून तो माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशराव चव्हाण व सदस्या विमलताई चव्हाण यांचा सुपुत्र होता.
जनुनावरून उमरखेडकडे अमोल चव्हाण, अरिवद चव्हाण हे दोघे एमएच २९/एजी-४२७७ या मोटारसायकलने येत असतांना पुसद रोडवरील बेलखेड दहगाव फाटय़ादरम्यान तीन चाकी एॅपे ऑॅटोने कट मारल्याने अमोल गाडीवरून खाली कोसळला. तेवढय़ात मागून येणाऱ्या ट्रॅक्टरखाली तो चिरडला गेला, तर अरविंद चव्हाण जखमी झाला. अमोल चव्हाण यास उपचारार्थ नांदेडला नेत असतांना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर ऑॅटो व ट्रॅक्टर पसार झाले. अमोल चव्हाण याच्या पार्थिवावर मंगळवारी जनुना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, राजेंद्र नजरधाने यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.