थकीत वीज बिलापोटी महावितरणने खंडित केलेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी वीज खांबावर चढलेल्या १६ वर्षांच्या युवकाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना जिंतूर तालुक्यतील कुडा येथे घडली.
सध्या जिल्हाभरात महावितरण कंपनीकडून थकीत वीजबिलापोटी वीजपंपांचा पुरवठा खंडित केला जात आहे. खंडित झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकरी स्वत: खांबावर चढत आहेत. यातून शॉक लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. जिंतूर तालुक्यातील कुडा येथील युवकाने आपले प्राण गमावले. रामेश्वर भगवान मुटकुळे असे मृताचे नाव आहे. रामेश्वरच्या शेतातील वीजपुरवठा तोडण्यात आला होता. शुक्रवारच्या सायंकाळी ६ वाजता वीज जोडण्यासाठी रामेश्वर खांबावर चढला. त्याच्या हाताचा वीज तारेला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच भाजून मृत्यू झाला.