कला टिकवून ठेवण्यासाठी अनेकांना आयुष्य वेचावे लागते. संगीत, नृत्य या क्षेत्रांतील अशा कलाकारांना कालपरत्वे प्रतिष्ठा मिळत गेली, पण काही कलाप्रकार उपेक्षितच राहिले. ना काळाच्या पटलावर काही कला आणि कलाकारांना समजून घेण्यात आले, ना त्या कलाप्रकाराला प्रोत्साहन मिळाले. हिमरू विणकाम हा असाच कलाप्रकार. तंत्रज्ञानाने या हातमाग विणकामाला अधिकच अडचणीत टाकले. पण हिमरू नक्षीकाम जिवंत राहावे यासाठी अहमद कुरेशी यांनी केलेले प्रयत्न विलक्षण आहेत. आयुष्याचा ताना-बाना गुंफताना त्यांनी हिमरू जिवंत ठेवण्यासाठी नवीन विणकर घडविण्याचे काम हाती घेतले आणि आता सामाजिक दायित्व निधीतून त्यासाठी मदत मिळत आहे. अहमद कुरेशी यांनी या क्षेत्रात केलेल्या कामासाठी अलीकडेच त्यांना ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे.

जगात भारताची खरी ओळख पोचली ती मलमलच्या वस्त्रामुळे आणि हातमागावरील उत्पादनामुळे. जगभरातील ही ओळख हजारो वर्षांपूर्वीची. १३ व्या शतकात या कलेला राजाश्रय होता. विणकरांना खास पदरी बाळगले जायचे. मोहम्मद बिन तुघलकाने जेव्हा राजधानी दौलताबाद येथे आणली तेव्हा त्याच्याबरोबर अनेक विणकरही आले. त्यांचे नक्षीदार विणकाम ‘हिमरू’ नावाने नावारूपाला आले. तत्कालीन राजवस्त्राचे विणकाम करणारे अनेक कारखाने त्या काळात दौलताबादच्या परिसरात सुरू झाले. पुढे राजधानीचे स्थळ पुन्हा बदलले. पण अनेक विणकर, कारागीर याच भागात स्थायिक झाले. अहमद कुरेशी यांचे पूर्वजही याच भागात राहिले. पिढय़ान्पिढय़ा हिमरू शाल आणि वस्त्रनिर्मितीचा वारसा चालविण्याचे अहमद कुरेशी यांनी ठरविले, पण तोपर्यंत बराच कालखंड उलटून गेला. हिमरू विणकाम टिकेल का, असा प्रश्न निर्माण झाला. मोजकेच विणकर शिल्लक राहिले. १९७५ च्या आसपास तंत्रज्ञान बदलत गेले. हातमागाऐवजी वीज वापरून यंत्राच्या साहाय्याने विणकाम होऊ लागले, तोपर्यंत परदेशातून येणारा पर्यटक आवर्जून हिमरू खरेदी करत असे. पुढे हातमागावरील हिमरू वळचणीला पडले आणि यंत्रावरील कपडाच हिमरू म्हणून विक्री होऊ लागला.

अशा काळात हिमरू टिकवून ठेवण्याचे काम कुरेशी यांनी केले. विणकामातील नक्षीही बदलली. अजिंठा लेणीमधील चित्रांमध्ये कमळ फूल हिमरूमध्ये आणण्यात आले. ‘मोगले आझम’ चित्रपटात पृथ्वीराज कपूरने घातलेल्या शेरवानीवरील नक्षीकाम वापरात यावे यासाठी ते, त्यांची मुले आता प्रयत्नशील आहेत. औरंगाबादच्या नवाबपुरा भागात पूर्वी हातमाग क्षेत्रातील अनेक जण होते. जेव्हा मागणी अधिक होती तेव्हा वाराणसीवरून कारागीर बोलावून काम पुढे नेण्यात आले. सध्या केवळ सात किंवा आठ कारागीर शिल्लक आहेत. ही नक्षीकला पुढे टिकवायची असेल तर कारागिरांची प्रशिक्षणे वाढवायला हवीत. ही प्रक्रिया वैयक्तिक पातळीवर पुढे नेण्यापेक्षा कुरेशी यांच्या प्रयत्नांना सरकारी प्रोत्साहनाची गरज आहे. हिमरू शाल आणि तिचे कलात्मक विणकाम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचावे म्हणून कुरेशी यांनी केलेल्या कामाची दखल ‘अनंत भालेराव स्मृती प्रतिष्ठान’ने घेतली.