मर्यादांची जाणीव हे वैशिष्टय़ चेतेंद्र प्रताप सिंह चौहान म्हणजेच चेतन चौहान यांनी क्रिकेटपटू, प्रशासक व राजकीय नेते या विविध भूमिका बजावताना जपले. त्यांची महत्त्वाची ओळख म्हणजे सुनील गावस्कर यांचा सलामीचा नियमित साथीदार. पण गावस्कर यांच्या खात्यावर १०,१२२ धावा होत्या, तर चौहान यांनी ४० कसोटी सामन्यांत २०८४ धावा केल्या. गावस्कर यांनी विक्रमी ३४ शतके झळकावली, तर चौहान यांना तब्बल नऊ वेळा ८० ते ९७ या धावांदरम्यान बाद झाल्यामुळे शतकाने हुलकावणी दिली. पण १६ अर्धशतके त्यांनी नोंदवली. हेल्मेट परिधान करणारे चौहान हे भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू. १९७७ ते १९८१ हा त्यांच्या कारकीर्दीतील सुवर्णकाळ. चौहान यांनी गावस्कर यांच्या साथीने ११ शतकी सलामीच्या भागीदाऱ्या केल्या.

त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बरेलीचा. परंतु सेनादलात अधिकारीपदावर असलेल्या वडिलांची १९६० मध्ये पुण्यात बदली झाल्यामुळे  वाडिया महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपटू कमल भांडारकर हे त्यांचे प्रशिक्षक. १९६६ मध्ये रोहिंटन बारिया करंडक क्रिकेट स्पर्धेत चौहान यांनी पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळेच विझ्झी करंडक स्पर्धेत त्यांची पश्चिम विभागातून निवड झाली. अंतिम सामन्यातील दुसऱ्या डावात गावस्करसह त्यांनी प्रथमच सलामीची जबाबदारी सांभाळली. या कामगिरीमुळे १९६७ मध्ये त्यांना महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळाले. मग रणजीतील सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर १९६९ मध्ये त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. २५ मिनिटे खात्यावर एकही धाव नसलेल्या चौहान यांनी मग ब्रूस टेलरला चौकार, षटकारांची आतषबाजी केली. कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामनाही ते न्यूझीलंडविरुद्ध खेळले. १९७५ पासून दिल्लीत राहणाऱ्या चौहान यांनी निवृत्तीनंतर, सर्वात वादग्रस्त क्रिकेट संघटना मानल्या जाणाऱ्या दिल्ली क्रिकेट संघटनेतील पदे सांभाळली.

राजकारणातील त्यांचा प्रवेश त्या मानाने सुकर झाला. भाजपने अमरोहा लोकसभा मतदारसंघातून त्यांना १९९१ मध्ये उमेदवारी दिली, तेव्हा ५८ टक्के मते मिळवून ते खासदार झाले. ही जागा त्यांना १९९६ मध्ये राखता आली नाही. १९९८ मध्ये पुन्हा येथूनच ते लोकसभेत गेले, परंतु १९९९ मध्ये पराभूत झाले. मोदीकाळात, जून २०१६ मध्ये ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’चे अध्यक्षपद त्यांना मिळाले आणि २०१७ मध्ये  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढविण्याची संधीही. नौगवाँ सदात मतदारसंघातून निवडून आल्यावर, आदित्यनाथ मंत्रिमंडळात त्यांना सैनिक कल्याण आदी खात्यांचे मंत्रिपद मिळाले.