05 April 2020

News Flash

काकासाहेब चितळे

डिलांनी वाढवलेल्या या व्यवसायाला आधुनिक रूप देण्याचे काम काकासाहेबांनी केले

चितळे डेअरी आणि मराठी माणसाचे नाते केवळ घरोघरी सकाळी-सकाळी पोहोचणाऱ्या त्यांच्या दुधामुळे नाही; तर हा व्यवसाय करताना त्यांनी आजवर जपलेले चारित्र्य, मूल्य आणि ग्राहकहित यातून बांधले गेलेले आहे. हे असे अतूट बंध काही एका रात्री तयार होत नाहीत. त्यासाठी सलग तीन तीन पिढय़ांना या उत्पादनाशी तना-मनाने स्वत:ला बांधून घ्यावे लागते. चितळेंच्या या प्रवासातील एक महत्त्वाचे नाव दत्तात्रय भास्कर तथा काकासाहेब चितळे, ज्यांचे नुकतेच देहावसान झाले. मॅकेनिकल इंजिनीअर असलेले काकासाहेब शिक्षण पूर्ण होताच वडील भास्कर तथा बाबासाहेब चितळेंसोबत ‘चितळे उद्योग समूहा’त कार्यरत झाले. या समूहाच्या उद्योगविस्तार आणि प्रगतीत त्यांचा मोठा वाटा होता. वडिलांनी वाढवलेल्या या व्यवसायाला आधुनिक रूप देण्याचे काम काकासाहेबांनी केले. यासाठी जगभरातील दुग्ध व्यवसायाचा अभ्यास करून नवनवे तंत्रज्ञान, अत्याधुनिक यंत्रणेचा त्यांनी ‘चितळे डेअरी’त अवलंब केला. दुधाचा दर्जा राखणे, उत्पादनात वाढ करणे, दूध उत्पादकांचे प्रबोधन करणे, त्यांच्या व्यवस्था अद्ययावत करणे आणि दुग्ध उत्पादन करणाऱ्या जनावरांचे आरोग्य, दर्जा वाढवणे यावरही त्यांनी भर दिला. या प्रयत्नांमुळे ‘चितळे डेअरी’च्या उत्पादनात केवळ संख्यात्मक वाढ न घडता दर्जाही कमालीचा उंचावला. उत्पादनातील सातत्य, दर्जा आणि ग्राहकाभिमुख सेवा या त्रिसूत्रीने ‘चितळे डेअरी’ने अल्पावधीत आपला सामाजिक नावलौकिक वाढवला. या साऱ्यांमागे काकासाहेबांचे तब्बल सहा दशकांचे परिश्रम आधारभूत आहेत. हे सर्व करताना त्यांनी शेकडो स्थानिकांना रोजगार दिला. अनेकांना या दुग्ध व्यवसायात उभे करत स्वावलंबी केले. या उद्योगाचा विस्तार आणि विकास करतानाच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही कार्याचे मानदंड प्रस्थापित केले. सांगली-भिलवडी परिसरातील अनेक शाळा, वाचनालये, संस्थांचे ते आधार होते. ‘जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन’, भिलवडी सार्वजनिक वाचनालय, भिलवडी शिक्षण संस्था, मुंबई माता-बाल संगोपन केंद्र, विवेकानंद नेत्र चिकित्सालय, ‘नॅब’, लायन्स अशी या संस्थांची मोठी यादी बनवता येईल. यांपैकी अनेक संस्थांचे ते अध्यक्ष, आश्रयदाते होते. भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे ते गेल्या २७ वर्षांपासून अध्यक्ष, तर भिलवडी शिक्षण संस्थेचे गेली अनेक वर्षे विश्वस्त व संचालक होते. या संस्थांच्या पाठीशी ते केवळ आश्रयदाते या नात्याने न राहता त्यांनी त्यांच्या कार्यातही आमूलाग्र बदल केले. भिलवडी वाचनालयात त्यांनी सुरू केलेला वाचनकट्टा, शाळांमध्ये घडवलेले बदल, अलीकडे सांगली-कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या संकटकाळी ‘चितळे डेअरी’च्या माध्यमातून उभे केलेले मदतकार्य ही सर्व त्यांच्यातील सामाजिक जागल्याचीच लक्षणे होती. शेती, आरोग्य, नेत्रदान, रक्तदान, उद्योग अशा अनेक चळवळींशीही त्यांनी जोडून घेतलेले होते. ‘चितळे’ आणि मराठी माणसाचे खूप जवळचे आणि आत्मीयतेचे नाते

का आहे, याचे खरे उत्तर शोधू लागलो तर व्यावसायिक सचोटीबरोबरच त्यांच्या जगण्यातील या सामाजिक मूल्यांजवळही आपल्याला थांबावे लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 1:55 am

Web Title: chitale group director kakasaheb chitale profile zws 70
Next Stories
1 पंढरीनाथ जुकर
2 प्रा. गीता सेन
3 राजा मयेकर
Just Now!
X