मातेला झिका विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने किमान तीस देशांत जन्माला आलेल्या काही बाळांमध्ये मेंदू कमी आकाराचा आहे. विशेष करून ऑलिम्पिक होऊ घातलेल्या ब्राझीलमध्ये या रोगाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. चिकुनगुन्या, डेंग्यू व झिका हे तीनही रोग एडिस एजिप्ती नावाच्या डासामधून विषाणूचा प्रसार झाल्याने होतात. झिका हे अजून तरी आपल्याकडे नाही तरी इतर देशांत संकटच आहे. कुठल्याही विषाणूजन्य रोगात विषाणूची रचना समजल्याशिवाय उपचार शक्य नसतात. या विषाणूची रचना अमेरिकेतील संशोधकांच्या चमूने उलगडली आहे. त्यात भारतीय वंशाची देविका सिरोही हिचा समावेश आहे. विशेष म्हणजे या चमूतील ती सर्वात तरुण संशोधक आहे. वयाच्या २९ व्या वर्षी एवढय़ा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संशोधनाची संधी मिळणे व त्याचे तिने सोने करणे या दोन्ही गोष्टी अभिमानास्पदच.
देविका ही परडय़ू विद्यापीठात स्ट्रक्चर अँड मॅच्युरेशन ऑफ फ्लॅविव्हायरसेस या विषयात डॉक्टरेट करते आहे. झिकासारख्या रोगाविरोधातील लढाईत तिने लावलेला हातभार हा नव्या दमाच्या भारतीय संशोधकांना प्रेरणा देणारा आहे. विज्ञान संशोधन हे सहनशक्तीचे व चिकाटीचे काम असते. झिका विषाणूची सगळी जनुकीय माहिती उलगडण्यास चार महिने लागले. एकूण सात संशोधक यात सहभागी होते, त्यात देविकाही आहे. या चार महिन्यांच्या काळात आम्ही रोज दोन-तीन तासच झोपत होतो, असे देविका सांगते. यावरून संशोधनात किती कष्ट असतात हेच प्रत्ययास येते. विषाणूची रचना उलगडल्याने त्यावर औषधे व लसी शोधणे सोपे होणार आहे. झिका विषाणू हा फ्लॅविव्हायरस प्रकारातील आहे. त्याच्या रचनेतील फरक हा ग्लायकोसायलेशन भागातील अमायनो आम्लांशी निगडित आहे. त्यामुळे या विषाणूला नामोहरम करण्यासाठी या भागावरच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. इतर विषाणू थेट मेंदूतील चेतासंस्थेपर्यंत पोहोचू शकत नाहीत, पण झिका विषाणू तेथे पोहोचतो व नवजात बालकांचा मेंदू कमी आकाराचा विकसित होऊन मोयक्रोसेफली हा रोग होतो. क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी तंत्राने या विषाणूची रचना अणूइतक्या सूक्ष्म पातळीवर उलगडण्यात आली आहे.
देविका मूळ उत्तर प्रदेशातील मेरठची. तिचे प्राथमिक शिक्षण तेथील सोफिया गर्ल्स स्कूलमध्ये तर दहावीनंतरचे शिक्षण दयावती मोदी अकादमीच्या महाविद्यालयात झाले. नंतर दिल्ली विद्यापीठातून तिने जैवरसायनशास्त्रात पदवी घेतली. मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेतून तिने याच विषयात एम.एस्सी. ही पदवी घेतली. तिची आई रीना बालरोगतज्ज्ञ आहे, तर वडील सत्येंद्रसिंह सिरोही हे रोगनिदानशास्त्रज्ञ म्हणजे पॅथॉलॉजिस्ट आहेत. ते दिल्लीत असतात. वडिलांना मुलीचा अभिमानच आहे. माझ्या मुलीने केवळ कुटुंबाचीच मान उंचावली आहे असे नाही तर आंतरराष्ट्रीय संशोधनात भारताचे प्रतिनिधित्व करून देशाची शान वाढवली आहे ,असे ते सांगतात.