News Flash

डॉ. पी. व्ही. राधादेवी

कुठलाही उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर त्याच्याकडून येणारे संदेश भूकेंद्रावर टिपले जात असतात

कुठलाही उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर त्याच्याकडून येणारे संदेश भूकेंद्रावर टिपले जात असतात, त्यामुळेच आपल्याला बरीच माहिती कळत असते. अवकाशातून माहिती संकलनाच्या या क्षेत्रात आता महिलाही आघाडीवर आहेत. त्यातीलच एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणजे डॉ. पी. व्ही. राधादेवी. त्यांना अलीकडेच ऑस्ट्रियन सोसायटी ऑफ सव्‍‌र्हेइंग अँड जिओइनफॉर्मेशन या संस्थेचा एदुआर्द डोलझल पुरस्कार मिळाला आहे.

राधादेवी या सध्या हैदराबाद येथे प्रगत माहिती संस्करण केंद्र म्हणजे ‘अ‍ॅड्रीन’ या अवकाश खात्याच्या संस्थेत काम करीत आहेत. दूरसंवेदन उपग्रहांच्या मदतीने पृथ्वीवरचे किती हरित आच्छादन गेले आहे, इथपासून ते नैसर्गिक आपत्तींच्या निरीक्षणापर्यंत अनेक कामे या केंद्रातून होत असतात. फक्तत्यासाठी उपग्रहाकडून आलेल्या माहितीचे संस्करण करणे व त्यावरून सामान्य भाषेत त्याचा अर्थ महत्त्वाचा असतो. राधादेवी यांच्या संशोधनामुळे आपल्या देशात या क्षेत्रात मोठी प्रगती करणे शक्य झाले आहे. त्यानिमित्ताने त्यांना इंटरनॅशनल फोटोग्रॅमेट्री अँड रिमोट सेन्सिंग काँग्रेस या संस्थेच्या अधिवेशनातही आता सहभागी होता येणार आहे. राधादेवी यांनी फोटोग्रॅमेट्री, दूरसंवेदन या क्षेत्रातही मोठे काम केले असून त्यामुळे विज्ञान संशोधनाला मोठाच हातभार लागला आहे, असे त्यांच्या मानपत्रात म्हटले आहे. डॉ. राधादेवी यांना हा पुरस्कार १८ जुलैला प्राग येथे प्रदान केला जात आहे. फोटोग्रॅमेट्री या विषयात डॉ. राधादेवी यांची विशेषता आहे. १९८९ मध्ये त्यांनी हैदराबादच्या प्रगत माहिती संस्करण केंद्र म्हणजे अ‍ॅड्रीन या संस्थेत काम सुरू केले. सध्या त्या जिओस्पॅटिअ कॉम्प्युटिंग अँड डाटा अ‍ॅनॅलिसिस या गटाच्या प्रमुख आहेत. भूमितीशास्त्राच्या मदतीने उपग्रह छायाचित्रणातील माहिती संस्करणाचे तंत्र त्यांनी विकसित केले. उपग्रहांच्या मदतीने कुठल्याही भागाचा अचूक नकाशा तयार करण्याचे काम याच तंत्राने केले जाते. त्यात फोटोग्रॅमेट्रीचा वापर केला जातो. कुठल्याही उपग्रहाच्या प्रतिमाचित्रण तंत्रात त्यांनी काही नवीन किफायतशीर तंत्राचे विकसन केले. इमेज रेक्टिफिकेशन, समन्वित सीसीडी समायोजन, जिओ इंटिग्रेशन या तंत्रात त्या वाकबगार आहेत. स्वयंचलित पद्धतीने माहितीचे विश्लेषण करण्याचे तंत्र त्यांनी शोधले. शेकडो दूरसंवेदन उपग्रहांना एकाच वेळी अनेक प्रतिमा माहिती तंत्राने हाताळण्याचे काम त्या करतात. अलीकडेच सोडण्यात आलेल्या काटरेसॅट या प्रतिमाचित्रण करणाऱ्या उपग्रहात राधादेवी यांची बरीच मेहनत आहे. डिजिटल मॅपिंग विभागात राधादेवी यांनी मोठे काम केले असून त्यांनी आयएससीए या संस्थेतून गणितात बीएस्सी पदवी घेतली आहे व २००१मध्ये त्यांना इस्रोचे युवा संशोधक सुवर्णपदक मिळाले होते. २००९मध्ये उत्कृष्ट महिला वैज्ञानिक पुरस्कारही मिळाला होता. एकूणच त्यांचे संशोधन कार्य अवघड विषयातले असले, तरी तरुणांना या क्षेत्राकडे आकर्षित करणारे आहे यात शंका नाही.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 2:55 am

Web Title: dr p v radhadevi
Next Stories
1 कॅप्टन राधिका मेनन
2 अब्दुल सत्तार एढी
3 नील ओ’ब्रायन
Just Now!
X