काही मोजक्या दलालांच्या छावण्यांच्या तालावर डोलणारे भांडवली बाजाराचे स्वरूप नव्वदीचे दशक उजाडेपर्यंत कायम होते. हर्षद मेहता, अश्विन मेहता, यूटीआयचा फेरवानी ही मंडळीच सर्वेसर्वा आणि तेच ठरवतील ते नियम-कानू. भारतीय रोखे व विनिमय मंडळ अर्थात ‘सेबी’नामक नियामक होते; पण नाममात्र आणि अस्तित्वहीन. वस्तुत: १९८८ साली स्थापित ‘सेबी’ला भांडवली बाजाराच्या नियमनाचा वैधानिक अधिकार प्राप्त झाला तो संसदेने ‘सेबी कायदा १९९२’ला मंजुरी दिल्यावर. तिचे दुसरे अध्यक्ष जी. व्ही. रामकृष्ण (‘जीव्हीआर’ म्हणून सुविख्यात!) यांचे याकामी अतुलनीय योगदान. तोवर निर्विकार असलेल्या या संस्थेला चेहरा, रूप व कार्याचा आवश्यक आवाका प्राप्त होऊन १२ एप्रिल १९९२ पासून एक स्वायत्त संस्था म्हणून ‘सेबी’चे कार्यान्वयन सुरू झाले. म्हणजे एका परीने जीव्हीआर यांच्याकडेच ‘सेबी’चे जनकत्व जाते.

छोटा गुंतवणूकदार जेथे खिजगणतीतही नव्हता तेथे त्याच्या हितरक्षणाची जीव्हीआर यांनी केलेली भाषा ही त्यावेळी खरे तर धाडसाचीच.  त्यासाठी त्यांची धडाकेबाज पावले हे बाजारातील त्यावेळच्या मातब्बर छावण्यांना थेट आव्हान होते. जीव्हीआर यांच्या उचलबांगडीसाठी राजकीय वर्तुळातून प्रयत्न सुरू झाले. पण जीव्हीआर यांनी सट्टेबाजीस कारण ठरणाऱ्या बदला व्यवहारांवर बंदी आणून प्रत्युत्तर दिले. १९९४ मध्ये जीव्हीआर यांचा ‘सेबी’वरील कार्यकाल विधीवत संपुष्टात आला. मात्र तोवर म्युच्युअल फंड, दलाल, उप-दलाल, सूचिबद्ध कंपन्या यांसह शेअर बाजारांचे नियमाधीन कामकाज, त्यांच्यावर नित्य प्रकटीकरण व खुलाशांचे बंधन, सार्वजनिक भागविक्री प्रक्रियेत ‘अस्बा’ (एएसबीए) समर्थित अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. आज म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘अ‍ॅम्फी’ या संस्थेच्या निर्मितीस कारक ठरलेल्या स्वयंनियमन संस्थेची मूळ कल्पनाही त्यांचीच. ‘सेबी’पाठोपाठ सध्याच्या सरकारसाठी कळीच्या ठरलेल्या ‘निर्गुंतवणूक आयोगा’चे जीव्हीआर हे पहिले अध्यक्ष. १९९९ साली वाजपेयी सरकारने सर्वप्रथम सरकारी कंपन्यांतील मालकी विकण्याचा कार्यक्रम हाती घेतला, त्याला जीव्हीआर यांनीच आकार दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रामाणिकता व समर्पण भावाची किंमतही त्यांना मोजावी लागली. राजकारण्यांशी संघर्षाची यादीच जीव्हीआर यांच्या ‘टू स्कोअर टेन : माय एक्स्पिरियन्सेस इन गव्हर्मेंट’ या चार पंतप्रधान पाहिलेल्या, ५० वर्षांची कारकीर्द सांगणाऱ्या आत्मकथनात आहे. ही कारकीर्द एका कर्तबगार, पण कायम पडद्याआड राहिलेल्या नायकाचीच! समर्पण भावाने कार्यरत राहिलेल्या जीव्हीआर यांनी ९१ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.