समाजशास्त्रज्ञ या नात्याने केम्ब्रिज विद्यापीठातील ‘ट्रिनिटी कॉलेज’चे फेलो तसेच अनेक पुस्तकांचे लेखक, चौथ्या पिढीतले नौकानयन-उद्योजक, ब्रिटनच्या फौजदारी न्यायप्रणालीत मोठाच बदल घडवणारे एक उमराव तसेच (आपल्या ‘सेबी’सारख्या) ब्रिटिश ‘सिक्युरिटीज अ‍ॅण्ड इन्व्हेस्टमेंट बोर्ड’चे अध्यक्ष.. हे चतुर्विध वर्णन गॅरी रन्सिमन या एकाच व्यक्तीचे आहे! यापैकी, ‘चौथ्या पिढीतले नौकानयन-उद्योजक’ किंवा ‘उमराव’ असणे, हे काही त्यांचे कर्तृत्व नव्हे. पण हा पिढीजात धंदा साडेसहा कोटी ब्रिटिश पौंड वा तेव्हाच्या ५२ कोटी रु. एवढय़ा किमतीस एका स्वीडिश कंपनीला विकून टाकण्याची धमक गॅरी यांचीच. व्हिक्टोरिया राणीच्या काळात पणजोबांनी वसाहतवादाला पूरक असा हा धंदा आरंभला होता, त्यातून पुढे आजोबांपासून उमरावकी (किताब ‘व्हिस्कॉन्ट’, पण संबोधन ‘लॉर्ड’च!) घराण्यात आली. पण १० डिसेंबर २०२० रोजी या जगाचा निरोप घेतलेल्या गॅरी रन्सिमन यांच्याविषयी ब्रिटिश माध्यमांत अगदी अलीकडेपर्यंत आदरांजली-लेख येत राहिले, ते समाजशास्त्र, वित्त आणि न्याय या तीन क्षेत्रांतील त्यांच्या कामगिरीसाठीच!

कुणी म्हणेल, ही सारी कामगिरी एकटय़ा ब्रिटन या देशापुरती होती.. ते अंशत: खरेही आहे. कोणत्याही ब्रिटिश न्यायालयाने कोणत्याही फौजदारी खटल्यात दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्यास भाग पाडू शकणारा ‘क्रिमिनल केसेस रिवू कमिशन’ हा कायमस्वरूपी आयोग त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या सूचनेनुसार स्थापण्यात आला- त्याची मातब्बरी ब्रिटनबाहेर नाही, किंवा वित्त क्षेत्रातील गॅरी यांचे कर्तृत्वही ब्रिटनपुरतेच आहे. शिवाय, समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी ब्रिटिश समाजच अधिक अभ्यासला, असा वाद घालत त्यांच्या काही पुस्तकांकडे बोट दाखवता येईल. ‘ट्रीटाइज ऑन सोशल थिअरी’ (१९८३, ८९ व ९७) हा त्रिखंडात्मक ग्रंथ मूलत: ब्रिटनची उदाहरणे देतो, असे म्हणता येईल. पण भांडवलशाही-समर्थक समाजशास्त्रज्ञाने कसे काम करावे, याचा वस्तुपाठ त्यांनी जगालाच घालून दिलेला नाही काय? मॅक्स वेबरच्या, भांडवलशाही कशामुळे तगते-वाढते याचा वेध घेणाऱ्या सिद्धातांचा टीकात्म फेरविचार गॅरी यांनी केला; प्लेटोचे ‘रिपब्लिक’, हॉब्जचे ‘लेव्हिअ‍ॅथान’ व मार्क्‍सचे ‘कॅपिटल’ यांचे खंडन करणारे ‘ग्रेट बुक्स, बॅड ऑग्र्युमेंट्स’ हे पुस्तक काय किंवा ‘कॅन देअर बी अ नीत्झ्शेअन सोशॉलॉजी?’ हा लेख काय, त्यांनी अभ्यासकी शिस्तीने (राजकीय ईष्र्येने नव्हे) लिहिले; तसेच स्वत:च्या संशोधनकार्याचे ‘नवडार्विनवादी’ असे वर्णन करण्यास ते कचरले नाहीत, ही वैशिष्टय़े देश-काळाच्या पलीकडे जाणारे विद्वान म्हणून त्यांची योग्यता सिद्ध करतात.