भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध दहशतवादाच्या घटनांमुळे कधी नव्हे इतके ताणले गेले असतानाच पाकिस्तान विषयात हातखंडा असलेले गोपाल बागले यांची नियुक्ती परराष्ट्र प्रवक्तेपदावर झाली आहे. ते विकास स्वरूप यांची जागा घेतील. स्वरूप यांची नेमणूक कॅनडात उच्चायुक्त पदावर झाली आहे.

बागले यांनी तीन वर्षे पाकिस्तानात उपउच्चायुक्त म्हणून काम केलेले असल्याने त्यांना पाकिस्तानच्या राजनीतीमधील खाचाखोचा चांगल्याच ज्ञात आहेत. त्याचा फायदा त्यांच्या या नेमणुकीमुळे भारताला राजनैतिक पातळीवर होणार आहे. गोपाल बागले हे १९९२ मध्ये परराष्ट्र सेवेत दाखल झाले. भारतीय परराष्ट्र सेवेच्या १९९२ च्या तुकडीतील ते अधिकारी असून त्यांनी लखनौ विद्यापीठात रसायनशास्त्रात एमएस्सी केल्यानंतर राजनैतिक सेवेचा पर्याय निवडला. १९९४ ते १९९६ मध्ये ते युक्रेनमधील कीव येथे कनिष्ठ आयुक्त होते. त्यानंतर १९९६ ते १९९९ दरम्यान त्यांनी रशियातील भारतीय दूतावासात द्वितीय सचिवपदी काम केले. १९९९ ते २००२ दरम्यान ते लंडनमध्ये उच्चायुक्तांचे सहायक होते. संयुक्त राष्ट्रातील नेमणूक हाही त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा भाग होता. माध्यमे, माहिती व संस्कृती या विभागाचे सल्लागार म्हणून ते काम करीत होते. काठमांडूत त्यांनी २००५ ते २००८ दरम्यान काम केले. त्या वेळी नेपाळने माओवादाच्या वर्चस्वाखालील देश असताना लोकशाहीकडे वाटचाल केली, त्या स्थित्यंतराचे बागले हे साक्षीदार आहेत. त्यानंतर त्यांना जी नेमणूक दिली गेली ती थेट पाकिस्तानात. २०११ ते २०१४ या काळात ते इस्लामाबाद येथे उपउच्चायुक्त बनले. त्यानंतर त्यांना पाकिस्तानविषयक सहसचिव हे पुढचे पद मिळाले. त्यात त्यांच्यावर पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराण या देशांच्या परराष्ट्र  मंत्रालयांशी समन्वय साधण्याचे काम होते. बागले यांची नेमणूक नेपाळशी आपले संबंध सुधारण्यास उपयुक्त ठरणार आहे. कारण त्यांना नेपाळी भाषा तर चांगली येतेच, शिवाय त्यांना तेथे प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव आहे. पाकिस्तान भारताशी चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असताना मोदी सरकारला सावध पावले उचलावी लागतील. पठाणकोट, उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध ताणलेले आहेत अशा परिस्थितीत भारताने नेमकी पाकिस्तानबाबत काय भूमिका घ्यावी हे ठरवण्यात बागले यांची मोठी भूमिका राहील. याशिवाय दोन्ही देशांत नेहमी वाक्युद्ध सुरूच असते, त्यात तोलूनमापून योग्य तेच बोलण्याचे कसब त्यांच्याजवळ आहे यात शंका नाही. पाकिस्तानशी निगडित इराण व अफगाणिस्तान या देशांचाही त्यांना चांगला अनुभव आहे. एकीकडे चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा ही डोकेदुखी आहे. मौलाना मासूद अझर याला दहशतवादी जाहीर करण्यात चीनने दोनदा संयुक्त राष्ट्रात भारताच्या प्रयत्नांमध्ये अडथळे आणले. त्यानंतर मॉस्को येथे अफगाणिस्तानसंबंधी शिखर परिषदेत हा विषय मांडण्यासाठी खास बागले यांना पाठवण्यात आले होते, यावरून त्यांची राजनैतिक वाटाघाटीतील निपुणता समजून यावी. भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर संपर्क वाढावा, त्यातून गुंतवणूकही मिळावी यासाठी एक विभाग परराष्ट्र मंत्रालयात सुरू करण्याचे पायाभूत कामही त्यांनी केले आहे. २०१७ मध्ये परराष्ट्र खात्यातील वीस अधिकारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची एक नवी फळी परराष्ट्र खात्यात पुढे येत आहे, त्यात बागले हे एक आहेत.