आपल्या देशात लोककलेचा गंध असलेली जी मोजकी शहरे आहेत त्यातील एक वाराणसी. या शहराने अनेक लोककलाकार दिले. त्यांच्यापैकी एक म्हणजे हीरालाल यादव. लोकगीत गायक म्हणून पूर्वाचलपासून बिहापर्यंत त्यांनी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. हीरालाल यादव यांच्यासारख्या कलाकारांनी ही कला पुढे नेली. त्यांच्या निधनाने लोकसंगीताच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

हीरालाल यांना नुकतेच पद्मश्री सन्मानाने अलंकृत करण्यात आले होते. आजारी असतानाही राष्ट्रपती भवनात जाऊन त्यांनी हा सन्मान स्वीकारला. ‘बिरहा’ गायकीला त्यांच्या रूपाने प्रथमच गौरवण्यात आले. वाराणसी व आसपासच्या भागांत हीरालाल यादव व बल्लू यादव या लोकगायकांच्या जोडीने धमाल उडवून दिली होती. त्यांच्या लोकगायकीला राष्ट्रभक्तीचा पैलू तर होताच, पण माधुर्यही होते. त्यामुळे स्वातंत्र्यसंग्रामातील आठवणी ते नव्या पिढीतही अगदी खुबीने ताज्या करीत असत. यातील बल्लू यादव यांचे आधीच निधन झाले आहे. हीरालाल हे वाराणसी जिल्ह्य़ातील हरहुआ तालुक्यातील होते. त्यांचा जन्म १९३६ मध्ये चेतगंजमधील सरायगोवर्धन येथे झाला. त्यांचे बालपण गरिबीत गेले. गुरे चरायला नेताना ते निसर्गाच्या सान्निध्यात गीते गुणगुणत असत, तीच त्यांच्या गायकीची सुरुवात! यथावकाश ‘बिरहा गायकीचे सम्राट’ होईपर्यंतची स्वरसाधना करताना त्यांना गुरू रम्मन दास यांचे आशीर्वाद लाभले. १९६२ मध्ये त्यांनी आकाशवाणी व दूरदर्शनवरून बिरहा शौकिनांना वेड लावले. भक्तिरसात ओथंबलेले लोकगीत गायन त्यांनी लोकप्रिय केले. त्याला शास्त्रीय संगीताची जोड देऊन वेगळी ओळख प्राप्त करून दिली. आजच्या भडक संगीताच्या काळात लोकगीतातील माधुर्य हरपत असताना ते त्यांनी कायम ठेवले. त्यांना अनेक सन्मान केवळ राजकारणामुळे मिळाले नाहीत, त्यामुळे ते नाराज होते. उत्तर प्रदेश सरकारने त्यांना संगीत नाटक अकादमी सन्मान दिला, तर विश्व भोजपुरी अकादमीने भिखारी ठाकूर सन्मानाने गौरवले. रवींद्रनाथ टागोर सन्मानही त्यांना मिळाला होता. याखेरीज ‘यशभारती’सह अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. गुरू रम्मन दास आखाडय़ात वयाच्या पाचव्या वर्षी बिरहा गायकीचा सूर पकडल्यानंतर त्यांनी सात दशके तरी त्यावर अधिराज्य गाजवले. त्यांनी मोठी शिष्यपरंपराही तयार केली आहे. त्यांच्या या कामगिरीचा सन्मान पद्मश्रीने झाला तेव्हा ते दुर्दैवाने बोलूही शकत नव्हते तरी त्यांनी त्याचे श्रेय जन्मभूमी व कर्मभूमी वाराणसीला दिले.

त्यांच्या निधनाने लोककलेचा एक खंदा पाईक आपल्यातून निघून गेला आहे.