भौतिकशास्त्रातील बलांच्या अभ्यासातून कर्करोगाच्या गाठी केमोथेरपीला दाद का देत नाहीत याचे स्पष्टीकरण करता येते, असे कुणी सांगितले तर आपण त्याला वेडय़ात काढू, पण तसे आहे खरे. अमेरिकेतील भारतीय वंशाचे वैज्ञानिक राकेश जैन यांनी या बलांमुळे कर्करोगाच्या गाठी कशा टिकून राहतात व त्यांच्यात उत्परिवर्तन होऊन त्या कशा वाढत जातात हे सांगितले आहे. त्यांना नुकतेच अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्रीय विज्ञान पदक जाहीर केले.
जैन हे अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस जनरल हॉस्पिटलच्या हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये अँड्रय़ू कूक अध्यासनाचे प्राध्यापक आहेत. कर्करोगाच्या किंवा इतरही गाठी आपल्या शरीरात असू शकतात, त्यांच्या वाढीची कारणे तपासण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्याच संशोधनातून कर्करोगावरील अ‍ॅवस्टीन हे औषध तयार करता आले. ‘गाठींचे जीवशास्त्र’ विषयातील त्यांचे संशोधन जागतिक स्तरावर मान्यता पावले असून अनेक नामांकित संस्थांनी त्याला मान्यताच नव्हे तर पुरस्कारही दिले आहेत. नेचर बायॉलॉजीचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार, सोसायटी ऑफ अमेरिकन आशियन सायंटिस्ट या संस्थेचा कर्करोग संशोधन पुरस्कार, अमेरिकन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल इंजिनीयर्सचा अल्फा सिग्मा पुरस्कार असे मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. कर्करोगावर त्यांनी लिहिलेला संशोधन लेख सायंटिफिक अमेरिकन नियतकालिकात २००८ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्याचे नाव होते ‘टेमिंग व्हेसल्स टू ट्रीट कॅन्सर’. त्याचा अर्थ कर्करोग उपचारासाठी रक्तवाहिन्यांना काबूत ठेवणे असा आहे. कर्करोगावर अजूनही केमोथेरपीचे उपचार प्रभावी ठरत नाहीत, कारण रक्तवाहिन्यांतून गाठींना रक्तपुरवठा होतच असतो, त्यामुळे या गाठींचा रक्तपुरवठा रोखण्यासाठी अँजियोजेनेसिस औषधे वापरता येतात. त्यांचा उंदरातील ग्लिओब्लास्टोमा या मेंदूच्या कर्करोगात चांगला परिणाम दिसून आला आहे. आपल्या शरीरात प्रत्येक पेशीची एक परिसंस्था म्हणजे आजूबाजूची स्थिती असते त्यात कोलॅगनचे जाळे, विशिष्ट प्रकारचे ह्य़ालुरोनन नावाचे जेल असते, त्याचा कर्करोगाच्या वाढीशी संबंध असतो. विशिष्ट प्रकारची भौतिक बलेही या रचनेत काम करीत असतात म्हणून कर्करोगात अनेक उपचार अपयशी ठरतात व अनेकदा प्रतिकारशक्तीही ढासळते, असे त्यांचे म्हणणे आहे.