भारतीयांना केलुचरण महापात्र माहीत असतात आणि असायलाही हवेच, कारण ते खरोखरच थोर ओडिसी नृत्यगुरू. संजुक्ता पाणिग्रही ते झेलम परांजपे अशी दोन पिढ्यांतील शिष्यांची प्रभावळ त्यांनी घडवली. पण ‘केलुदा’ म्हणून परिचित असलेल्या या दिवंगत नृत्यगुरूंची पत्नी मात्र ओडिशाबाहेर कुणाला माहीत नाही, याचे कारण एकच : स्वत:कडे केवळ नृत्यकौशल्यच नव्हे तर समाजाचे संकेत मोडण्याची धमक असूनसुद्धा लक्ष्मीप्रियायांनी ‘केलुदांच्या पत्नी’ आणि शिष्यांच्या ‘गुरुमाँ’ ही भूमिका स्वीकारली व निभावली! तीन दिवसांपूर्वी लक्ष्मीप्रियाही केलुदांच्या वाटेने या जगातून गेल्या. तेव्हासुद्धा ‘ओडिसीचा जाहीर कार्यक्रम करणारी पहिली (महिला) नर्तक’ हे श्रेय लक्ष्मीप्रिया यांना देण्यास अनेकजण कचरले.
वास्तविक, ज्ञात इतिहास असे सांगतो की, ओडिसी नृत्याचे कार्यक्रम १९३० च्या दशकात देवळांबाहेर- ‘कलेचे सादरीकरण’ म्हणून- होऊ लागले, तेव्हापासून कुणाही महिलेचा सहभाग या कलामंचावर नव्हता. ‘गोटिपुआ’ आणि ओडिसी हे एकमेकांसारखे नृत्यप्रकार पुरुषांचेच, किंवा ‘अकुलीन’ मानल्या जाणाऱ्या स्त्रियांचे. अशा काळात खुरदा येथे जन्मलेल्या लक्ष्मीप्रिया आईसह पुरी शहरात आल्या, तिथे आईच्या अनुमतीने नृत्य शिकू लागल्या. १९४६ मध्ये त्यांचा पहिला कार्यक्रम झाला, तेव्हा तबला वाजवीत होते केलूदा! तोवर केलूदा हे गोटिपुआ आणि ओडिसी, दोन्ही शिकले असले तरी, तालवाद्य-वादनही शिकले होते आणि बहुधा लक्ष्मीप्रियांसाठी तयार झाले होते! याचे कारण, पुढल्या वर्षभरातच त्यांचा विवाह झाला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर कथ्थक, कथकली, भरतनाट्यम यांच्यासह ओडिसीलाही ‘शास्त्रीय नृत्यप्रकार’ असा दर्जा मिळाला, त्यात लक्ष्मीप्रियांचे गुरू राम मनिआ, काशीनाथ साहू, लिंगराज नंदा आदींचा सहभाग मोठा. पण लग्नानंतर नृत्यांगना म्हणून कार्यक्रम करणे लक्ष्मीप्रियांनी कमी केले आणि त्याऐवजी नाटके किंवा नृत्यनाट्यांत त्या काम करू लागल्या. ‘मोहिनी’ हे त्यांची प्रमुख भूमिका असलेले नृत्यनाट्य सलग १०० दिवस प्रेक्षकांची गर्दी आणि दाद मिळवत होते. त्यानंतरची ‘मॅनेजर’, ‘कालापहाड’ आदी नाटके आणि ‘आलोक’, ‘जहर’, ‘दशावतार’ आदी नृत्यनाट्येही लक्ष्मीप्रिया यांच्या नृत्याभिनयगुणांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीची ठरली. त्यांच्या साठी-सत्तरीतल्या छायाचित्रांतही डोळ्यांचे भावदर्शित्व लपत नाही. पण केलूदांचा मृत्यू २००४ मध्ये झाला, त्यानंतर लक्ष्मीप्रियांचे डोळे विझत गेले. अखेर, एकही राष्ट्रीय सन्मान न मिळवताच त्यांनी जगाचा निरोप घेतला.