शिक्षकांची भूमिका कुठल्याही देशात फार महत्त्वाची ठरते. विद्यार्थी हेच माझे प्रेरणास्थान आहेत असे सांगणारे शिक्षक फार क्वचित असतात, त्यात अमेरिकेतील भारतीय वंशाच्या प्राध्यापक व संशोधक रूपा अय्यर या एक आहेत. त्या जैवतंत्रज्ञ असल्या तरी शिक्षक म्हणूनही त्यांचा नावलौकिक मोठा आहे. त्यांना नुकताच अमेरिकेतील ह्य़ूस्टन विद्यापीठाचा उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण क्षेत्रात काम करण्याची मिळालेली संधी व विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील संशोधन असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. शिक्षण क्षेत्रात दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे. ह्य़ूस्टन विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाच्या संस्थापकांपैकी त्या एक आहेत. जैवतंत्रज्ञान विषयात त्यांनी अध्यापनाचा ‘फॉरमॅट ट्रेनिंग’ प्रकार वापरला असून विद्यार्थ्यांना नुसते पढतमूर्ख न बनवता प्रत्यक्ष व्यवहारातही त्याचा वापर करण्यास शिकवले आहे. २००५ पासून त्या ह्य़ूस्टन विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक व संशोधन विभागाच्या अधिष्ठाता आहेत. पर्यावरण, जैवतंत्रज्ञान व त्याचा प्रत्यक्ष व्यवहारातील उपयोग हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय आहे. अय्यर यांना २०१५ मध्ये फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळालेली असून अमेरिकेच्या शिक्षण व सांस्कृतिक विभागाने त्यांना सन्मानित केले आहे. ‘माझे विद्यार्थीच माझी प्रेरणा आहेत व त्यांच्यात काम करताना मला नवीन कल्पना सुचतात. या कल्पना अध्यापन कौशल्याशी व संशोधनशी निगडित असतात,’ असे त्या सांगतात. अय्यर यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्समधून जैवविज्ञानात बी.एस्सी. केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून जैवतंत्रज्ञानात पीएच.डी. केली. नंतर त्या उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीतून त्यांनी वनस्पतिशास्त्र व वनस्पती रोगनिदानशास्त्रात पीएच.डी. केली. बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून दुसरी पीएच.डी. केली. त्यानंतर ह्य़ूस्टन येथील अॅण्डर्सन कर्करोग संशोधन केंद्रातून संशोधन केले. जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना त्यांनी ह्य़ूस्टन येथे सेंटर फॉर लाइफ सायन्सेस टेक्नॉलॉजीच्या संचालक म्हणून तरुण संशोधकांची नवी पिढी घडवण्याचे मोठे काम केले आहे. कर्करोगविरोधी औषधांच्या संशोधनात त्यांचा सहभाग आहे. नासाच्या जैवतंत्रज्ञान कार्यक्रम आखणीतही त्या सहभागी आहेत. २०११ मध्ये त्यांना इंडियन कल्चर सेंटरचा उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कारही मिळाला होता. त्याशिवाय त्या मिशिगन स्टेट विद्यापीठाच्या थॉमन फेलोही आहेत. जैवतंत्रज्ञान हा त्यांचा ध्यास आणि श्वास आहे. जैवतंत्रज्ञान हा विषय विद्यार्थ्यांत त्यांनी लोकप्रिय केला. शालेय पातळीपासूनच जैवतंत्रज्ञ घडवण्यासाठी ‘ब्रिजेस टू द फ्युचर’ कार्यक्रमासाठी त्यांना १० लाख डॉलरचे अनुदानही मिळाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2016 रोजी प्रकाशित
रूपा अय्यर
शिक्षकांची भूमिका कुठल्याही देशात फार महत्त्वाची ठरते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 21-05-2016 at 02:56 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roopa iyer