लोकांच्या समस्या जाणून घेऊन राजकीय क्षेत्रात गेल्यावर त्या सोडवण्यासाठी अथक परिश्रम घेणारे नेते आता दुर्मीळ होत आहेत. त्या अर्थाने सुरजितसिंग बर्नाला यांनी पंजाबबरोबरच देशातील राजकारणातील स्थित्यंतरे अनुभवली. १९४२ च्या चले जाव चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. पंतप्रधानपदाने त्यांना दोनदा हुलकावणी दिली. मात्र बर्नाला यांचे मोठे योगदान म्हणजे पंजाबमध्ये दहशतवादाने थैमान घातलेल्या १९८५ ते ८७ या अत्यंत कठीण काळात त्यांनी राज्याची धुरा सांभाळली. सुवर्ण मंदिरात पोलीस पाठवल्याने स्वपक्षीयांचा रोष ओढवून घ्यावा लागला. त्याच्या निषेधार्थ २७ आमदारांनी राजीनामे दिले होते. त्या वेळी अकाली दलाच्या लोंगोवाल गटाच्या सरकारचे नेतृत्व त्यांनी केले.

तत्त्वासाठी तडजोड त्यांच्या स्वभावात नव्हती. चंद्रशेखर पंतप्रधान असताना १९९१ मध्ये तत्कालीन द्रमुक सरकारच्या बरखास्तीची शिफारस करण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर बिहारमध्ये राज्यपालपदी त्यांची रवानगी करण्यात आली तेव्हा मात्र पदत्याग करून त्यांनी बाणेदारपणा दाखवून दिला होता. पंजाबमध्ये टोकाचे अस्मितेचे राजकारण सुरूअसताना बर्नाला यांची प्रतिमा अकाली दलातील मवाळ राजकारणी अशी होती. राजीव गांधी व हरचरणसिंग लोंगोवाल यांच्यात जो ऐतिहासिक शांतता करार झाला, त्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. १९७७ मध्ये ते संसदेवर निवडून गेले. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात कृषी खात्याचे मंत्रिपद सांभाळताना, १९७८ मध्ये बांगलादेशबरोबरच्या गंगा पाणीवाटप करारावर स्वाक्षरी केली. मोरारजी देसाई यांचे सरकार कोसळल्यानंतर १९७९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींनी बर्नाला यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय सरकारची कल्पना मांडली होती. मात्र घोडेबाजाराच्या भीतीने ती बारगळली.

१९९६ मध्ये त्रिशंकू स्थितीत बर्नाला यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांच्या अकाली दलाने भाजपच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधानपद हुकले. १९९७ मध्ये भाजप व मित्रपक्षांचे ते उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार होते. तर १९९८ च्या वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रात खत व रसायन मंत्रिपद भूषवले. आज नावारूपाला आलेल्या अमृतसरच्या गुरुनानक देव विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. १९६९ मध्ये राज्याचे शिक्षणमंत्री भूषवताना त्यांचे हे योगदान आहे. तामिळनाडूचे तीन वेळा राज्यपाल याखेरीज उत्तराखंडचे पहिले राज्यपाल, आंध्र प्रदेश तसेच ओडिशा व पुद्दुचेरीच्या राज्यपालपदाची धुराही त्यांनी सांभाळली. काँग्रेसविरोधात त्यांचे बहुतांश राजकारण होते. अकाली दलात मतभेद झाल्यानंतर चार पक्षांच्या छोटय़ा आघाडीचे ते प्रमुख होते. मात्र वयपरत्वे राज्याच्या राजकारणात त्यांचा प्रभाव ओसरला. आजच्या काळात राजकारणात सत्तेचे महत्त्व आहे. बर्नाला यांनी मात्र तत्त्वाचे राजकारण केले.

प्रकाशसिंग बादल यांच्याशी मतभेद झाल्यानंतर बर्नाला यांनी राज्यात राजकीय ताकद आजमावून पाहिली पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यांच्या पत्नी सुरजित कौर यांनी बादल यांच्याविरोधात मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या अयशस्वी ठरल्या. त्यांचा थोरला मुलगा जसजितसिंग आम आदमी पक्षात आहे. पंजाबच्या राजकारणात एक मवाळ नेता अशीच बर्नाला यांची ओळख राहिली.