03 August 2020

News Flash

विजयानिर्मला

स्त्री दिग्दर्शक सहसा ‘लोकप्रिय’ लाटेवर स्वार झालेल्या दिसत नाहीत.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कन्नड वगळता तीनही भाषांतील एकंदर २०० चित्रपटांत अभिनय, ही त्यांची एक जमेची बाजू. त्याहीपेक्षा महत्त्वाचा पैलू म्हणजे, ‘सर्वाधिक चित्रपट दिग्दर्शित करणारी महिला’ म्हणून त्यांच्या नावे जागतिक विक्रम – अगदी ‘गिनीज बुका’त- नोंदविला गेला आहे! विजयानिर्मला यांचे गेल्या शुक्रवारी, २८ जून रोजी पहाटे निधन झाले; त्यानंतर दाक्षिणात्य आणि विशेषत: तेलुगु चित्रपटसृष्टी हळहळली ती एका सुस्वभावी, मनमिळाऊ व लोकप्रिय दिग्दर्शिकेस मुकल्यामुळे.

स्त्री दिग्दर्शक सहसा ‘लोकप्रिय’ लाटेवर स्वार झालेल्या दिसत नाहीत. लोकप्रिय चित्रपटांतील स्त्रीदर्शन बदलण्याचा प्रयत्न अनेक गुणी दिग्दर्शिकांनी केला, त्यांना लाटेबाहेर जाण्याची किंमत मोजावी लागली. पण वडीलच निर्माते आणि माहेरची अनेक माणसे चित्रपटसृष्टीत असल्यामुळे असेल कदाचित, विजयानिर्मला यांना लोकप्रिय चित्रपटांविषयी काहीच तक्रार नव्हती. त्यांचा जन्म १९४४ चा आणि वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्या पडद्यावर प्रथम झळकल्या! बालकलाकार म्हणून पुढेही कृष्णाच्या भूमिकेत त्या गाजल्या. नंतर नायिकेच्या भूमिका मिळत असताना, ख्यातनाम तेलुगू अभिनेते कृष्णा हे त्यांचे आधी पडद्यावरचे आणि पुढे आयुष्यभराचे साथी झाले. कृष्णा आणि निर्मला यांचा मुलगा नरेश हादेखील आता तेलुगु  चित्रपटसृष्टीत आहे.

नायिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट (भार्गवि नीलायम्- १९६४) मल्याळम् भाषेत होता, तर  दिग्दर्शिका म्हणून त्यांचे पदार्पण ‘मीना’ (१९७१) या चित्रपटापासून झाले. यानंतरचा ‘कविथा’ हा मल्याळम् चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला, परंतु आय. व्ही ससी यांनी बरीच दिग्दर्शकीय मदत केली होती. त्यानंतर मात्र, स्वत:हून अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. काही चित्रपटांच्या त्या निर्मात्याही झाल्या. ‘अमर अकबर अँथनी’वर बेतलेला ‘राम रॉबर्ट रहीम’ हा तेलुगु चित्रपट त्यांनी बनविला, त्यात राम होते रजनीकांत आणि रॉबर्टच्या भूमिकेत कृष्णा. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत १९७० आणि १९८० च्या दशकांत त्यांचे चित्रपट भरपूर चालले. पुढे कृष्णा यांच्या निधनानंतर आणि वयपरत्वे त्यांनी काम कमी केले, परंतु बालाजी टेलिफिल्म्सच्या तेलुगु चित्रवाणी मालिकेत त्यांनी अभिनय केला. प्रसन्न, परंतु करारी व्यक्तिमत्वाच्या निर्मला यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले नाहीत, पण आंध्र प्रदेशचा सर्वोच्च चित्रपट सन्मान त्यांना मिळाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2019 12:06 am

Web Title: vijaya nirmala mpg 94
Next Stories
1 अब्बुरी छायादेवी
2 व्ही आर लक्ष्मीनारायणन
3 डॉ. शैक एन मीरा
Just Now!
X