Mothers Day 2024 Unique Gift Ideas: दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. काही देश वेगवेगळ्या तारखांना हा दिवस साजरा करतात, पण भारत, अमेरिका (यूएसए), कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह काही देशांमध्ये मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणून साजरा केला जातो. ही परंपरा सुमारे १११ वर्षांपासून सुरू आहे. यंदा १२ मे ला भारतात मदर्स डे साजरा होणार आहे. या मदर्स डे च्या निमित्ताने तुमच्या लाडक्या आईला यंदा तुम्ही सक्षम बनवून आयुष्यभर पुरेल असे एखादे गिफ्ट देऊ शकता. ज्या आईने आपल्याला आपल्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं तिला स्वतःला सावरायची शक्ती देणारे काही सर्वोत्तम गिफ्ट पर्याय आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. तुमच्या बजेटनुसार तुम्ही यातील एखादा पर्याय जरी निवडलात तरी तुम्ही तुमच्या आईच्या भविष्यासाठी योगदान देऊ शकता. चला पाहूया..

वैद्यकीय तपासणीसाठी पाठवा

अनेक माता अजूनही स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत नाहीत. मदर्स डेच्या निमित्त तुम्ही तुमच्या आईसाठी एखादं फुल बॉडी चेकअप सेशन बुक करू शकता. अनेक ठिकाणी अशा चेकअप साठी पॅकेज डील सुद्धा दिल्या जातात. निरोगी असतानाही एखाद्या व्यक्तीने वय वाढताना वर्षातून किमान २ ते ३ वेळा वैद्यकीय तपासणी करणे हे हिताचे ठरते. तुम्ही तुमच्या आईसाठी हे आरोग्यदायी गिफ्ट देऊन तिचे भविष्य निरोगी राहील याची तरतूद करू शकतात. बरं यात तुमच्याही फायद्याची दुसरी बाब म्हणजे कलम ८० ड अंतर्गत ५००० रुपयांपर्यंत आरोग्य तपासणीसाठी केलेला खर्च हा करामध्ये वजावट म्हणून दाखवण्याची सुद्धा मुभा आहे. साधारण अनेक वैद्यकीय चाचण्यांचे सेशन हे तीन ते पाच हजार रुपयांच्या खर्चामध्ये बुक केले जाऊ शकतात.

आर्थिक सल्लागार

आरोग्याची खातरजमा केल्यावर आपण आपल्या आईला आर्थिक दृष्ट्या सबळ बनवण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकता. वाटल्यास तिच्यासाठी एखादा उत्तम व विश्वासार्ह गुंतवणूक सल्लागार शोधा. जो आईला प्रत्येक महिन्यात उत्तम गुंतवणुकीच्या संधींविषयी मार्गदर्शक करून देईल. अलीकडे अनेक सल्लागार हे कमिशन शिवाय सुद्धा काम करतात म्हणजे तुम्हाला एखादी ठराविक रक्कमेची प्राथमिक फी द्यावी लागेल मात्र त्याव्यतिरिक्त ते कोणतेही शुल्क आकारात नाहीत. अगदी १० ते २५ हजारापर्यंत फी आकारणारे अनेक सल्लागार तुम्ही शोधू शकता.

SIP मध्ये गुंतवणूक

जर आपल्याला आर्थिक सल्लागाराची मदत घ्यायची नसेल तर आपण स्वतः देखील आईच्या नावे एखादी SIP चालू करू शकता. दरमहिन्याला ठराविक रक्कम आपण आईच्या नावे या SIPs मध्ये गुंतवू शकता. ती रक्कम व त्यावरील व्याज हे थेट तुमच्या आईच्या खात्यात जोडता येऊ शकते. अगदी ५०० ते १००० रुपयांपासून अलीकडे SIP करण्याची मुभा आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःलाही फार खर्चात न टाकता हा पर्याय नक्कीच विचारात घेऊ शकता.

वरिष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या योजना

तुमच्या आईचे वय ६० किंवा त्याहून जास्त असेल तर तुम्ही वरिष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या अत्यंत सुरक्षित अशा गुंतवणूक योजनांमध्ये पैसे स्वतः गुंतवू शकता किंवा आईला गुंतवण्याची सवय लावू शकता. पाच ते दहा वर्षांच्या गुंतवणुकीच्या प्लॅन्सवर किमान ७ टक्क्यांहून अधिक व्याजदर देणारे अनेक प्लॅन्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. आपण आपल्या बँकेतून सुद्धा अशा योजनांची माहिती घेऊ शकता. काही योजनांमध्ये गुंतवणुकीच्या नंतर अगदी तिसऱ्या महिन्यापासूनच व्याजदार येण्याची सुरुवात होऊ शकते. याची स्वतः सखोल माहिती घेऊन मग पैसे गुंतवा.

प्रधानमंत्री वय वंदना योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेप्रमाणेच, प्रधान मंत्री वय वंदना योजना ही सेवानिवृत्तांना नियमित उत्पन्न देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. 10-वर्षांची योजना मासिक पर्यायावर ७. ४०% खात्रीशीर परतावा देते. १० वर्षांच्या शेवटी, मूळ रक्कम पॉलिसीधारकाला परत केली जाते. PMVVY चे व्यवस्थापन LIC द्वारे केले जाते आणि हा एक अतिशय सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. प्रति व्यक्ती गुंतवणुकीवर १५ लाख रुपयांची मर्यादा आहे.

हे ही वाचा<< Anti Rape Underwear काय काम करतात बघा; श्रीमंतीच्या वेडात उत्पादकांनी महिलांच्या ‘या’ प्रश्नांची उडवली खिल्ली

पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक

जर तुमच्या आईला सोने खरेदी करायला आवडत असेल तर तिला पेपर गोल्डची ओळख करून द्या. गोल्ड बाँड किंवा गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक ही तुमच्या आईची सोन्याची हौस नक्कीच पूर्ण करू शकते. त्यात फायदा असा की शुद्धतेची काळजी, निर्मिती शुल्क, सुरक्षित साठवणुकीची चिंता न करता, तुम्हाला केवळ फायदे मिळवता येऊ शकता. गोल्ड ईटीएफ खरेदी करणे देखील चांगली कल्पना आहे, परंतु त्यासाठी तुमच्या आईला डीमॅट आणि ट्रेडिंग खाते आवश्यक असेल. म्युच्युअल फंडातील गोल्ड फंड थोडे शुल्क आकारेल, परंतु त्यासाठी डीमॅट किंवा ट्रेडिंग खात्याची आवश्यकता नाही. पाच ते दहा हजार खर्चात तुम्ही या कागदी सोन्यामध्ये पैसे गुंतवू शकता.