‘अल्फाबेट ग्रॅनी’! कोण बरं या अल्फाबेट ग्रॅनी?… तर त्या आहेत कार्तयानी अम्मा. ही अवलिया आहे केरळमधल्या चेप्पड अलप्पुळा गावातली एक सर्वसाधारण स्त्री. राज्य सरकारने राबवलेल्या प्रौढ साक्षरता अभियानात सापडलेला एक हिराच. २०१८ मध्ये केरळ साक्षरता अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या ‘अक्षरलक्षम’ पात्रता परीक्षेला बसलेल्या सर्वांत वयोवृद्ध. १०० पैकी ९८ गुण मिळवून त्या पहिल्या आल्या. त्यांच्याविषयी बातम्यांमधून, वृत्तपत्रांतून आणि समाजमाध्यमांवर वाचत गेले, तशी त्यांच्या ध्येयासक्तीची गोष्ट अजूनच उत्कंठावर्धक वाटत गेली. मग यू ट्यूब व्हिडियोवर पाहिलं… अहाहा! शुभ्र कॉटनची केरळी साडी, मॅचिंग आणि अनुभवसंपन्नता दाखवणारे पांढरेशुभ्र केस, सावळा वर्ण, छोटी चण, चेहऱ्यावर बोळकं दाखवून केलेलं खळखळतं हास्य, लखलखते, उत्सुकतेनं भरलेले डोळे… या सगळ्यात माझं लक्ष वेधून घेतलं त्यांच्या सुरकुतलेल्या हातांनी. आयुष्यभर केलेल्या अपार कष्टांच्या खाणाखुणा अभिमानाने मिरवणारे ते हात आणि उतारवयात वही आणि पेन घेऊन शिक्षणाचं शिवधनुष्य लीलया उचलणारे ते हात.

लहानपणीच भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी अम्मांवर पडली होती. पुढे लग्नानंतर त्यांना २ मुलगे आणि ४ मुली झाल्या. पण धाकटी मुलगी ४० दिवसांची असतानाच पतीचं निधन झालं. अम्मा परत एकदा कुटुंबासाठी उभ्या राहिल्या. देवळासमोर झाडलोटीचं काम करून त्यांनी आपल्या कुटुंबाचं पालनपोषण केलं. पुढे आपले दोन्ही मुलगे आणि दोन मुली यांच्या मृत्यूचं दुःखसुद्धा त्यांनी सोसलं. परिस्थितीनं एवढं गांजून गेल्यावरसुद्धा अम्मांनी, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धडपड चालूच ठेवली. पुढे अनेक वर्षांनी प्रापंचिक जबाबदाऱ्या समर्थपणे निभावून झाल्यानंतर मात्र त्यांना त्यांचं सुप्त स्वप्न अजूनही खुणावत होतं. शिकायचं स्वप्न. हे स्वप्न कधी बरं पाहिलं असेल त्यांनी?… आणि ते पूर्ण व्हायची किती वर्षं वाट पाहायला लागली?…

हेही वाचा… गच्चीवरची बाग: झुळुझुळु पाणी, गाते आनंदगाणी

आमच्या नवीन पिढीत मनासारखं घडलं नाही तर आम्ही लगेच निराश होतो… पण अम्मांनी तर चक्क वयाचं ९६ वं वर्षं येईपर्यंत पेन हातात धरायची वाट पाहिली! याची सुरूवात कुठे झाली, हीपण एक गम्मत आहे. म्हणजे त्यांचीच मुलगी अम्मीनी अम्मा या जेव्हा त्यांच्या ६० व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या, तेव्हा अम्मांना विश्वास वाटू लागला की आपणही आपलं स्वप्न पूर्ण करू शकू.

मला तर ‘अलकेमिस्ट’ या पुस्तकामधलं वाक्यच आठवलं… ‘ज्याचा निर्धार पक्का असतो, त्याला परिस्थितीसुद्धा त्याचं ध्येय गाठण्यासाठी मदत करत असते.’ अम्मांचा प्रौढ शिक्षणाचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. त्या थरथरत्या हातात वही-पेन घेऊन घराच्या अंगणात बसून शिकू लागल्या. कधी शेजारीपाजारी, नातवंडं, मुली कधी इतर कुणीही, यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ लागल्या. चातकाप्रमाणे ज्ञानकण शोषून घेऊ लागल्या. पायरीवर बसून पाढे म्हणू लागल्या. कधी कधी एखादं पान लिहिण्यासाठी त्यांना एक एक दिवस लागायचा! पण अम्मांची विजिगिषु वृत्ती त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची शक्ती देत होती. कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या संस्थेनं अम्मांना ‘वय आणि परिस्थितीला न जुमानता तुम्ही ‘अक्षरलक्षम’ प्रकल्पात जी कामगिरी केली ती राष्ट्रकुलातील सर्व विद्यार्थ्यांना प्रेरित करेल.’ असं प्रमाणपत्र दिलं. २०२० मध्ये केंद्र सरकारनंही त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. शिक्षणमंत्री सी. रवींद्रनाथ यांनी त्यांना लॅपटॉप भेट दिला. तेव्हा त्या लगेच आपलं नाव इंग्रजीत टाईप करायला शिकल्या आणि म्हणाल्या, ‘आता मला दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी करायची आहे!’

हेही वाचा… कामजिज्ञासा: लग्नाची पहिली रात्र आणि कल्पनाविलास

वाळूवर अक्षरं गिरवण्यापासून, वही-पेन आणि नंतर लॅपटॉपवर लिहीणाऱ्या कार्तयानी अम्मांचा हा रोमहर्षक प्रवास अखेर ११ ऑक्टोबर २०२३ रोजी वयाच्या १०१ व्या वर्षी संपला. आयुष्याच्या शेवटच्या काळात का होईना, आपल्या स्वप्नांसाठी आपण जगलो याचे समाधान निरोप घेताना त्यांना नक्की मिळालं असेल.

खरंतर देशात दिवसेंदिवस स्त्रीचे स्थान अधिकच खालावतं आहे काय, अशा काही घटना ठिकठिकाणी घडत आहेत. त्या वाचून विषण्ण व्हायला होतं. पण तेव्हाच एका ‘अल्फाबेट ग्रॅनी’ची बातमी वाचायला मिळते आणि काही क्षण का होईना, बरं वाटतं. परत एकदा आपलं नैराश्य झटकून प्रेरित झाल्याची भावना निर्माण होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्तयानी अम्मांची जिद्दीची कहाणी सर्व स्त्रियांना आपापल्या आयुष्यात आणि करिअरमध्ये वय आणि परिस्थितीचा ताण न घेता स्वतःच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रयत्न करायला नक्कीच शिकवेल.