प्रत्येक माणसाचे आयुष्य हे अनेक चढ-उतारांनी भरलेलं असतं. आयुष्य सुरळीत मार्गानं चालत असताना, अचानक असं काही वळण लागतं की सारं काही हडबडून जातं. अशावेळी निर्माण होणारे प्रश्न हे कधी माणसाला निराशेच्या खाईत लोटतात तर कधी आकाशाला गवसणी घालणाऱ्या स्वप्नांपर्यंत पोहचवितात. नुकत्याच डीएसपी बनलेल्या अंजू यादव यांची कहाणी अशीच रंजक आहे. तेव्हा जाणून घेऊया त्यांच्या या कहाणी विषयी…
हरियाणातील धौलडा गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात अंजूचा जन्म झाला. कुटुंबात आई-वडिलांसह तीन बहिणी. चरितार्थ चालविण्यासाठी शेतीबरोबर एक छोटंसं दुकानही टाकलं होतं. आपल्या मुली शिकल्या पाहिजेत या उद्देशानं त्या बहिणींना सरकारी शाळेत घातलं. अंजूनं १२ वी पर्यंतचं शिक्षण आपल्या सरकारी शाळेत पूर्ण केलं आणि सरकारी कॉलेजच्या माध्यमातून दूरस्थ शिक्षणाद्वारे बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं.
त्यानंतर वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षीच राजस्थानमधील एका कुटुंबात तिचं लग्न करण्यात आलं. सर्वसामान्य विवाहित स्त्रीप्रमाणे तिचा संपूर्ण दिवस घरकाम करण्यात जात होता. लग्नानंतर काही वर्षांनी तिला एक मुलगा झाला. सारं काही सुरळीत सुरू असताना एका आजारपणाच निमित्त होऊन त्यात तिचा नवरा मृत्यू पावला. परिणामी, विधवा सून आणि तिचा मुलगा आता सासरी अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे त्यांना त्रास देण्यास सुरुवात झाली. तेव्हा कुणावरही ओझं न बनता आपण स्वत:च्या पायावर ठाम उभं राहायचं या निर्धारानं ती मुलासह माहेरी परतली.
स्वत:च्या शिक्षणाच्या आणि मेहनतीच्या जोरावर ती सरकारी शाळेत नोकरी मिळविण्यात यशस्वी झाली. मुलाला आपल्या माहेरी सांभाळायला ठेवून तिनं मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्यानंतर दिल्ली येथे सरकारी शाळेत नोकरी केली. दिल्ली येथील सरकारी शाळेत पाच वर्षे नोकरी केल्यानंतर तिला सरकारी परीक्षांविषयी समजलं. तेव्हा परीक्षा द्यायला काय हरकत आहे ,या विचारानं मेहनत घेऊन, तयारीनं तिनं परीक्षा दिली. या मेहनतीचं योग्य ते फळ तिच्या पदरी पडलं. परीक्षा, मुलाखत असं सर्व सोपस्कार यशस्वीरित्या पार पडल्यानंतर राजस्थान पोलिस सेवेमध्ये तिची निवड झाली. २०२४ च्या मे महिन्यात तिने डीएसपी म्हणून सेवाभार सांभाळला, तेव्हा तो क्षण तिच्यासह घरातील सर्वांसाठीच अभिमानाचा क्षण होता.
अंजूचा हा प्रवास वाटतो तितका सहज निश्चितच नव्हता. आजही लग्नानंतर बहुतांश स्त्रिया स्वत:च्या स्वप्नांना, इच्छांना फारसं महत्त्व देत नाहीत. त्यातून अंजूची पार्श्वभूमी ही गावातली. एकदा का मुलीचं लग्न लावून दिलं की, कुटुंबाची जबाबदारी संपली. मग पुढे तिला शिकू द्यायचं का नोकरीला लावायचं याचा निर्णय तिचा नवरा आणि सासरची मंडळी घेतील ही मानसिकता आजही पाहायला मिळते. तिथं त्या मुलीच्या इच्छेचा विचारच केला जात नाही. शिवाय घरची सून म्हणजे बिन पगारी हक्काचा नोकर, या मानसिकतेमुळे बहुतांश विवाहित स्त्रियांचा वेळ हा चूल आणि मूल आणि घरकामातच जातो. इतकं सारं केल्यानंतर स्वत:च्या स्वप्नांना खत-पाणी घालायलादेखील त्यांना वेळ उरत नाही.
परंतु याही खडतर परिस्थितीत अंजूनं स्वत:मधील स्वप्न जागृत ठेवलं होतं. आपण घेतलेल्या शिक्षणाचा काहीतरी फायदा होईल, जेणेकरून आपण आपल्या पायावर उभे राहू, हा विश्वास तिनं कायम आपल्या मनात जागृत ठेवला. त्यामुळेच नवरा गेल्यानंतर परिस्थितीशी दोन हात करायला ती सज्ज झाली. एकेरी पालकत्व निभावताना आपल्याला कोणकोणत्या अडचणीना तोंड द्यावं लागेल, याचा विचार करूनच तिनं माहेरी परतण्याचा निर्णय घेतला.
माहेरी आल्यावरसुध्दा आपला आणि आपल्या मुलाचा भार कुटुंबावर न टाकता स्वत:च्या पायावर उभी राहिली. या तिच्या प्रवासात तिच्या माहेरच्या लोकांनी तिला खूप मोलाची साथ दिली. खासकरून कोणत्याही प्रकारची तक्रार न करता तिच्या आईनं तिच्या मुलाचा योग्यरीतीनं सांभाळ केला.
नोकरी करीत असताना आपण आणखी काय मोठं करू शकतो, याचा सातत्यानं अंजू विचार करीत असे. त्यामुळेच जेव्हा तिला स्पर्धा परीक्षांविषयी समजलं तेव्हा त्या विषयीची ओढ तिच्या मनात निर्माण झाली. आणि तिनं त्याबाबत मेहनत घेण्यास सुरुवात केली. या मेहनतीचं योग्य ते फळ तिच्या पदरी पडलं आहे. खरोखरीच हरियाणातील घागरा-चोळी परिधान करणारी सर्वसामान्य स्त्री ते डीएसपी च्या गणवेशातील अधिकारी स्त्री असा अंजू यादवचा प्रवास हा सर्वांनाच प्रेरणादायी आहे हे निश्चितच.
suchup@gmail.com