अचानक का कोण जाणे चाल मंदावली. एक मंदसा सुगंध माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. नाकाला जाणवणाऱ्या गंधमुळे आपोआपच पायाची गती मंदावली. आपल्या संवेदना किती तीव्र असतात नाही ! संवेदना, संवेग या सगळ्यांचा अवयवांची असणारा संयोग तर थक्क करणारा. गंधाच्या जाणीवेने मन कानोसा घेऊ लागताच आपोआपच पायांनी वेग कमी केला. गंध होता तरी कसला? तर ती होती चक्क आपली रातराणी. इतक्या तीव्रतेने ती मला अशी सातासमुद्रापार हाकारत होती. बऱ्यापैकी उंच, पण छोटे वृक्ष वाटावेत इतक्या लांबी रूंदी ची रातराणीची झाडं ओळीने उभी होती. रस्त्याच्या एका कडेला लावलेली आणि पानापानागणिक फुलांनी बहरलेली.
नुकतीच सकाळ होऊ घातली होती… मी सीन नदीच्या काठावरून चालत होते. तितकंसं उजाडलं नव्हतं. पहाटही व्हायची होती. अंधाराचं एक तलम आवरण अख्खा आसमंत व्यापून होतं. नदीवरून येणारा गार वारा अंगाला बोचत होता.
दोन्ही बाजूने प्रशस्त काठ बांधून बंदिस्त केलेली सीन नदी आत्ता यावेळी कमालीची शांत होती. दिवसभर हिच्या काठावर काय काय होतं असतं, म्हणून असेल कदाचित आता ती थोडी निवांत झाल्यासारखी होती. नदीवरील पूल ओलांडून अरूंद लाकडी पायर्यांपाशी पोहोचले. रात्रीचं पॅरिस बघायला येणारे लोक या इथेच तर बसतात. त्यांच्यासाठीच केलेली खास बैठक व्यवस्था होती ती. पायऱ्या उतरून पलिकडच्या बाजूने चढून मी बस स्टॉप पाशी निघाले होते. एरवी रात्री साडेदहापर्यंत प्रकाशणारा सूर्य, काठावर उमललेली गर्दी, अंधारायला लागल्यावर सीन नदीतून फेरफटका मारणाऱ्या त्या भल्यामोठ्या बोटी, काठावरची बेधुंद तरूणाई, ते उसळत्या तारूण्याचे फुत्कार, आश्चर्यमिश्रीत भाव, सेकंदासेकंदाला उसळणारा उत्साह सगळं सगळं आता या क्षणी शांत होतं. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. मला बस गाठायची होती, त्यामुळे मी झपझप चालत होते.
अचानक का कोण जाणे चाल मंदावली. एक मंदसा सुगंध माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. नाकाला जाणवणाऱ्या गंधमुळे आपोआपच पायाची गती मंदावली. आपल्या संवेदना किती तीव्र असतात नाही ! संवेदना, संवेग या सगळ्यांचा अवयवांची असणारा संयोग तर थक्क करणारा. गंधाच्या जाणीवेने मन कानोसा घेऊ लागताच आपोआपच पायांनी वेग कमी केला. गंध होता तरी कसला? तर ती होती चक्क आपली रातराणी. इतक्या तीव्रतेने ती मला अशी सातासमुद्रापार हाकारत होती. बऱ्यापैकी उंच, पण छोटे वृक्ष वाटावेत इतक्या लांबी रूंदी ची रातराणीची झाडं ओळीने उभी होती. रस्त्याच्या एका कडेला लावलेली आणि पानापानागणिक फुलांनी बहरलेली.
मी क्षणभर तिथेच थांबले. नदीवरचा मंद वारा या रातराणीच्या गंधाला माझ्यापर्यंत घेऊन आला होता. मुळात धुंद करणारा वास आणि त्यात ही पहाटेची रम्य वेळ काल मुद्दाम बघायला म्हणून गेले होते तरीही रात्रीच्या वेळी चकाकणाऱ्या आयफेल टॉवर पाशी फार वेळ रेंगाळावस मला वाटलं नव्हतं, पण आत्ता पहाट वेळी ही रातराणी मात्र मला हलू देत नव्हती.
जणूकाही म्हणत होती, थांब की ग थोडावेळ आपण थोड्या गप्पा मारू… निशब्द!
युरोपभर फिरताना, तिथला निसर्ग भरभरून अनुभवताना, नकळत माझं मन माझ्या परिचित वानस मित्रांना शोधत होतं. ज्युंगफ्राव वरून उतरताना वाटेत एक सुरेख गाव लागलं वेन्जेन. दाट धुक्याने बर्फाच्छादित शिखरांची वेढलेलं वेनजेन फुलांनी नुसतं बहरलं होतं. फुलं फुलली होती सभोवती, पण मला मात्र खुणावत होतं ते आपल्या बहाव्यासारखं फुलांचे घोस मिरवणार एक पिवळधम्मक झाड. वेनजेनमध्ये फिरताना मी जिकडे तिकडे त्यालाच शोधत होते.शेवटी एका खाजगी बागेत बंगल्याच्या फाटकापाशी हा वृक्ष सापडला. पिवळ्या फुलांचे जमिनीकडे झुकलेले नाजूक घोस मिरविणारा तो विलक्षण सुंदर वृक्ष होता. फुलं तरी किती नाजूक अगदी एखाद्या कलाकाराने खास आखून रेखून काढावीत अशी. बहाव्याची फुलं मात्र आकाराचं बंधन न पाळणारी. पाकळ्या कशा तर मुक्तपणे पसरलेल्या. पिवळ्या मुलायम पाकळ्या आणि वाटोळीशी हिरवी गडद पानं यांनी सजलेला बहावा विलक्षण दिसतो.इथे या नीटस वृक्षांची पानही मोठी कलात्मक धाटणीची होती. कोणीतरी अगदी ठरवून वेळ काढून साकारली असावीत अशी.
अधिरतेने मी झाडापाशी गेले, पण मनाला तितकीशी प्रसन्नता वाटली नाही. वाटलं काही तरी कमी आहे या सगळ्यात बहाव्याचं गारूड मनावर होतं म्हणूनही असेल, पण त्या सुंदर प्रदेशातल्या सुंदर फुलांमध्ये मन गुंतलं नाही.
माणूस कुठेही असला तरी त्याचं परिचित जग शोधत असतो. आधीच्या जाणिवा, संवेदना, दृश्य परिणाम यांच्याशी अपरिचित जगाची पडताळणी करत राहतो हेच खरं.
स्वतंत्रपणे त्या त्या गोष्टीचा अनुभव आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा ती गोष्ट आपल्या परिचित जगाशी साधर्म्य दाखवणारी नसेल.
इथल्या निसर्गात मी माझ्या परिचित निसर्गाला शोधत होते. माझ्या अनुभवजन्य चौकटीत त्याला बसवत होते.
कळत होतं हे असं करायला नको पण…
हे सगळं आपल्या हातात थोडंच असतं…
हे सगळंच खूप स्वाभाविक असतं, आताही मी म्हणूनच रातराणी पाशी रेंगाळले होते. माझ्या परिचित जगातली रातराणी सापडल्याचा आनंद अनुभवत होते.
आल्प्समध्ये फिरताना युरोपभर भ्रमंती करताना तिथलं सौंदर्य अनुभवताना माझ्या स्मृतीतला निसर्ग हा असा सतत माझ्या सोबत होता हेच खरं!
mythreye.kjkelkar@gmail.com