गरम मसाल्यातील उष्ण तिखट चवीचे मिरे सर्वांनाच परिचित आहे. खडा मसाला म्हणून अनेक गृहिणी स्वयंपाकघरात कल्पकतेने त्याचा उपयोग पदार्थ बनविण्यासाठी करतात. मराठीत ‘मिरे’, हिंदीमध्ये ‘काली मिर्च’, संस्कृतमध्ये ‘मरिच’, इंग्रजीमध्ये ‘ब्लॅक पेपर’, तर शास्त्रीय भाषेमध्ये ‘पायपर नायग्रम’ (Piper Nigrum) या नावाने ओळखले जाणारे मिरे ‘पायपरेसी’ कुळातील आहे. याचा स्वाद तिखट असल्याने गुजरातमध्ये याला ‘तिरवा’ असेही म्हणतात.

जगातील सर्वात जुने आणि महत्त्वाचे मसाल्याचे पीक म्हणून मिरे ओळखले जातात. याचे काळी मिरी आणि पांढरी मिरी असे दोन प्रकार आहेत. याचे उत्पादन मुख्यतः दक्षिण भारतात कर्नाटक व केरळातील जंगलांमध्ये होते. सहसा सुपारीच्या झाडांवर मिऱ्याचे वेल चढविले जातात. याची पाने नागवेलीच्या पानांसारखीच असतात. या मिऱ्यांच्या वेलाला फळाच्या मंजिऱ्या येतात. या मंजिऱ्यांनाच मिरे असे म्हणतात.

हेही वाचा… आहारवेद : रुचकर मिरची

मिऱ्याच्या वेलाला ज्या शेंगा येतात त्यांना ‘गजपीपळ’ असे म्हणतात, तर मुळांना चवक असे म्हणतात. काळी मिरी लोणची, पापड व तिखट खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापरतात. तर पांढरी मिरी कमी तिखट आणि अधिक स्वादयुक्त असते. अनेक ठिकाणी तसेच युरोप, मलबार येथे हिरवी मिरी खाणे पसंत केले जाते. हिरव्या मिरीपासून लोणचे बनविले जाते.

औषधी गुणधर्म:

आयुर्वेदानुसार: मिऱ्यांना युक्त्या चैव रसायनम् असे म्हटले आहे. म्हणजेच मिऱ्याचा आहारामध्ये व औषधांमध्ये योग्य वापर केल्यास रसायनासारखे कार्य करते. मिरे तिखट, तीक्ष्ण, अग्नी प्रदीप्त करणारे, पित्तकारक, रूक्ष, कृमीघ्न, कफ व वातनाशक आहेत.

आधुनिक शास्त्रानुसार: मिऱ्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, खनिजद्रव्ये व ‘अ’ जीवनसत्त्व इत्यादी घटक असतात.

हेही वाचा… आहारवेद: पचनशक्तीवर्धक बडीशेप

उपयोग:

१) गरम दुधात मिरेपूड, हळद, एक लवंग व साखर घालून प्यायल्याने सर्दी-खोकला बरा होतो.

२) पाव चमचा मिरेचूर्ण, एक चमचा मध व एक चमचा साखर एकत्र करून चाटल्याने जीर्ण (जुना) खोकला बरा होतो.

३) ज्यांना दम्याची उबळ वारंवार येते, त्यांनी अर्धा चमचा मिरेपूड मधाबरोबर चाटल्यास दम्याचा आवेग कमी होतो.

४) मिऱ्याचे रोज दोन-तीन दाणे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोणताही आजार होत नाही.

५) रोजच्या आहारामध्ये मिऱ्याचा उपयोग करण्यासाठी मिरे कुटून वापरावेत. मिरेपूड करून ठेवली तर त्याचा स्वाद, गुणधर्म व गंध कमी होतो.

६) कोशिंबीर, आमटी, भाजी, लोणचे व पापडामध्ये मिऱ्याचा वापर करावा. यामुळे पदार्थाची चव वाढते.

७) मिरच्यांपेक्षा मिरे कमी दाहक व अधिक गुणकारी असल्याने अनेक लोक आहारामध्ये त्याचा वापर जास्त करतात. आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टिकोनातून मिरे वापरणे हितकारक आहे.

८) थंडीमुळे अंग गारठून आखडले असेल, तर मिरे पाण्यात बारीक वाटून त्याचा लेप अंगावर लावावा. यामुळे त्वचेमध्ये उष्णता निर्माण होऊन स्नायू व्यवस्थित कार्य करतात.

९) रांजणवाडी खूप सुजून डोळ्याची पापणी दुखत असेल, तर मिरे पाण्यात वाटून त्याचा सूक्ष्म कल्क रांजणवाडीवर लावावा. म्हणजे रांजणवाडी त्वरित पिकून फुटते. त्यातील पू निघून गेल्यामुळे आराम मिळतो. फक्त हा लेप लावताना तो डोळ्यात जाणार नाही याची मात्र काळजी घ्यावी. वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.

१०) एखाद्या व्यक्तीला तापामुळे किंवा दुःखद घटना ऐकल्याने बेशुद्धावस्था आली असेल, तर अशा वेळी त्या व्यक्तीच्या नाकामध्ये मिरीचे सूक्ष्म चूर्ण फुंकले असता त्याला असंख्य शिंका येऊन त्याची बेशुद्धावस्था नाहीशी होऊन तो शुद्धीवर येतो.

११) अजीर्ण, अपचनाचा त्रास होत असेल, तर सुंठ, मिरी, पिंपळी (त्रिकटू) याचे चूर्ण मधातून चाटण केल्यास अपचनाचा त्रास होत नाही.

१२) ताप खूप येऊन अशक्तपणा वाटत असेल व मन बेचैन झाले असेल, तर अशा वेळी काडेचिराईताबरोबर मिरेपूड घेतल्यास मनाची बेचैनी कमी होऊन ताप निघून जातो.

हेही वाचा… आहारवेद : हृदय बलकारक दालचिनी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सावधानता:

मिऱ्याचे अतिरिक्त सेवन झाले, तर जठर, आतड्यांमध्ये दाह होणे, पोटात दुखू लागणे, उलट्या होणे, मूत्राशय व मूत्रनलिकेत तीव्र दाह होणे, गुदनलिकेत व शौचाच्या जागी दाह होणे आणि त्वचेवर शीतपित्ताच्या गाठी होणे ही लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळल्यास मिऱ्याचा उपयोग सावधानतेने करावा व डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. उन्हाळ्यामध्ये मिऱ्याचा वापर करणे टाळावे.