श्रीप्रसाद पदमाकर मालाडकर
योगिनी जोगळेकर… मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव. शंभर वर्षांपूर्वी जन्मलेल्या- जेव्हा स्त्रियांना स्वत:चे विचार मांडण्याचं स्वातंत्र्यही नव्हतं- त्या काळात त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात मनमुक्त मुशाफिरी केली. कथा, कादंबरी, नाटक, लहान मुलांसाठी लेखन… साहित्याच्या अशा विविध वाड्यमयप्रकारात त्यांनी लेखन केलं आणि वाचकप्रिय लेखिका म्हणून लौकिकही मिळवला. साहित्य, गाणं या दोन्ही क्षेत्रात त्यांनी भ्रमंती केली, यश मिळवलं.

योगिनी जोगळेकर यांचा पुण्यात जन्म दिनांक ६ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. त्यांचे वडील अप्पाशास्त्री जोगळेकर यांचे वैद्यकीय, ज्योतिषशास्त्र आणि संवादिनी वादनावर प्रभुत्व होते. योगिनी जोगळेकर यांचे शालेय शिक्षण हुजूरपागा कन्या शाळेतून मॅट्रिकपर्यंत विविध कलांमध्ये प्राविण्य संपादन करून शिक्षण पुण्यात घेतले. त्यांची पहिली कविता शाळेच्या बालिका दर्शन मासिकात प्रकाशित झाली होती. ‘निशिकांतची नवरी’ या शालेय नाटकात त्यांनी अभिनय केला होता. आठव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. पंडित शंकर अष्टेकर, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, पंडित राम मराठे हे त्यांचे शास्त्रीय संगीताचे गुरू. योगिनी जोगळेकर यांनी महाविद्यालयात संस्कृत, मराठीत प्रथम श्रेणीत बी.ए. केले. त्यांना यशोदा चिंतामणी पारितोषिक, कुसुम वाघ पारितोषिक, विंझ पारितोषिक असे तीन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले.

एका पुरस्कारात तर त्यांना तानपुरासुद्धा मिळालेला होता.योगिनी जोगळेकर यांना नटवर्य गणपतराव बोडस यांनी ललित कलादर्श सह नाटककार होण्याचे प्रशिक्षण दिले. सन १९४८ ते १९५३ दरम्यान त्या पुण्यातल्या सरस्वती मंदिरात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. योगिनी जोगळेकर यांनी चाळीस कादंबर्‍या लिहिल्या. ‘वादळफूल’, ‘नादब्रह्म’, ‘प्राजक्ता’, ‘द्विदल’ या काही उल्लेखनीय ठरल्या. ‘गुरुशिष्य’, ‘तिळगुळ’, ‘खंडू’ अशी खास मुलांसाठीही पुस्तके लिहिली.चार कविता संग्रह; बालकवितांचे बारा संग्रह, चार नाटके- ‘मागील दार’, ‘तिसरी घंटा’, ‘तिघांच्या तीन तर्‍हा’, ‘रंगात रंगला श्रीरंग’; बावीस लघुकथा संग्रह लिहिले. ‘झुंजुमुंजू’ हा कथासंग्रह त्यांनी त्यांच्या पालकांना समर्पित केला. उलट सुलट’, ‘श्रवण’, ‘शर्यत’, ‘प्रतिक’, ‘ओटी’, ‘प्राची’ या लघुकथा प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘अश्वथ’, ‘जग’, ‘चैतन्य’, ‘साक्षात्कार’, ‘उमाळा चिमाखडे’, ‘पायगुण’, ‘कुणासाठी कुणीतरी’, ‘शिलंगण’, ‘आस्वाद’, ‘शर्यत’, ‘नादब्रह्म’ ‘चारुची आई’ असे विपुल लेखक केले. गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्यावरील ‘या सम हा’, आणि पंडित राम मराठे यांच्यावरील ‘राम प्रहर’ या कादंबऱ्या गाजल्या.

तो मुंबई मराठी साहित्य संघाचा डॉ. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देवून योगिनी जोगळेकर यांच्या साहित्य, संगीत कला सेवेचा सन्मान केला गेला. २००२ साली ७५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘संगीत सावित्री’ या नाटकातले ‘सजला नटला जणू राजा’, ‘संगीत शाकुंतल’ मधले ‘सखये अनसुये’, रंगात रंगला श्रीरंग’ मधले ‘उठा उठा हो श्रीरंगा’ या त्यांच्या स्वत’ गायलेलया, तसेच ‘मधुर स्वर लहरी या’, ‘हे सागरा नीलांबरा’ ही पंडित राम मराठे, ‘सखे बाई सांगते मी’, ‘हरिची ऐकताच मुरली’ हे किर्ती शिलेदार यांच्या स्वरातल्या ध्वनिमुद्रिका कालातीत अविस्मरणीय आहेत. त्यांच्या नाटकाच्या रौप्य महोत्सवी प्रयोगाच्या वेळी पुण्यात बालगंधर्व रंग मंदिरात सुप्रसिद्ध संगीतकार, समीक्षक केशव वामनराव भोळे हे कौतुकाने म्हणाले होते की, ‘‘तू भविष्यकाळात महान स्त्री नाटककार होशील.’’

साहित्य, गायन क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या योगिनी जोगळेकर यांचे दिनांक १ नोव्हेंबर २००५ रोजी पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधना पश्चात त्यांच्या सदाशिव पेठेतल्या निवास स्थानाजवळच्या मार्गाला ‘योगिनी जोगळेकर मार्ग’ असे नामकरण केले गेले. आपल्या संपन्न साहित्यकृतींनी त्या मराठी वाचकांच्या मनात कायम राहतील.