‘आई आणि बाबांच्यात काही ‘केमिस्ट्री’ दिसत नाही! ‘रोमँटिक’ जोडपी वागतात तसं आई-बाबा कधी वागताना दिसले नाहीत…’ तरूण मुलगा आणि मुलगी दोघांचं हेच म्हणणं होतं. खरंच त्यांच्या आई-वडिलांच्यात प्रेम नव्हतं का?…
“एवढं ओझं घेऊन एकटीच आलीस ना? बाबांना फोन का नाही केलास? ते आले नसते का तुला घ्यायला?” मनाली आईला रागातच बोलत होती. तिनं आईच्या हातातील बॅग आणि पिशव्या घेतल्या आणि तिला खुर्चीवर बसवलं.
“आई, १८ तासांचा प्रवास करून आल्यावर, एवढं ओझं घेऊन परत मेट्रोनं येण्याची काय गरज होती? बाबांना बोलवायचं नव्हतं तर, कॅब करायची आणि सरळ घरापर्यंत यायचं”
तेवढ्यात सलील पाण्याचा ग्लास घेऊन आला, “आई,पाणी घे आधी. केवढी दमलेली दिसतेस!”
मनालीनं घरात असलेला गूळपापडीचा लाडू आणला आणि म्हणाली, “आधी हा लाडू खा आणि मगच पाणी घे.”
सलीलनं विचारलं, “आई, तुझ्याबरोबरच्या अर्चना मॅडम, सुजाता मॅडम आणि माधवी मॅडम कशा घरी गेल्या?”
“अरे, त्यांच्या घरचे लोक न्यायला आले होते. प्रत्येकाची घरं वेगवेगळ्या दिशेला आहेत. पण मला कॅबपेक्षा मेट्रो सोयीस्कर वाटते, म्हणून मी मेट्रोनं आले. तुम्ही दोघं किती काळजी करताय माझी! परीक्षा जवळ आली आहे, तुम्ही तुमच्या अभ्यासाचं बघा.”
“बघितलंस सलील! म्हणजे सगळ्या मैत्रिणींचे नवरे त्यांना घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेले, पण हिनं बाबांना कळवलंही नाही”
“बाबांना कळवलं तरी बाबा कधी जातात? तुला कधी तरी आठवतंय बाबा आईला ऑफिसमध्ये सोडायला गेलेत, आणायला गेलेत? कधी तिच्यासाठी काही सरप्राईज गिफ़्ट घेऊन आलेत? कधी तिला वाढदिवसाला स्पेशल ट्रीटमेंट दिलीय?’’
हेही वाचा : देखभाल खर्च एकतर्फी कमी करणे गैरच!
“खरं आहे रे सलील तुझं, आई बाबांचा सतत विचार करते. त्यांना त्रास नको म्हणून त्यांची काळजी घेते. पण ते कधीही तिच्यासाठी स्पेशल काहीही करत नाहीत. आताच्या व्हॅलेंटाईन डेला मी बाबांना आठवण केली होती, तेव्हा ते म्हणाले, ‘असा प्रेम साजरा करण्याचा एकच दिवस नसतो! असं काही घेऊन देणं हा फक्त दिखाऊपणा आहे.’”
“मनाली काय आहे, की आपली आई फक्त सहन करीत राहते. स्त्रीशक्ती, स्त्रीचं आत्मभान, वगैरेंवर बाहेर लेक्चर देते आणि घरात मात्र अन्याय सहन करते.”
मंजिरी दोघांचं बोलणं ऐकत होती. मुलं आता मोठी होत आहेत याची जाणीव तिला झाली. ती मनातल्या मनात हसत होती. मुलं असा विचार का करताहेत हे तिला कळतं नव्हतं, पण तरीही घरातल्या घरात आई चांगली की बाबा चांगले, कोण योग्य आणि कोण अयोग्य, अशा गोष्टी मुलांच्या मनात येऊच नयेत. दोघांपैकी एकाची तरी आदरयुक्त भीती नक्की असावी, पण आई आणि बाबा हे वेगळे नसून एकच आहेत आणि त्यांच्यावर समान प्रेम असावं, कुणा एकाचंही पारडं जड नको, असं तिला वाटतं होतं. मुलांनी दिलेला लाडू आणि पाणी तिनं घेतलं आणि ती म्हणाली,
“बाळांनो,जोडीदाराचा वाढदिवस साजरा केला, सरप्राईज गिफ्ट दिलं, व्हॅलेंटाइन डेला फुलं आणि ग्रीटिंग कार्ड दिलं आणि त्याच्या पुढे पुढे केलं म्हणजेच प्रेम असतं असं नाही. तुमच्या बाबांचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे! ऑफिसात सोडायला, आणायला ते कधी आले नसतील, पण मला आयुष्यात उभं रहायला त्यांनी मदत केलीय. त्यांच्या सपोर्टमुळे मी माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. माझ्या परीक्षेच्या वेळेस ते तुम्हा दोघांना सांभाळायचे. म्हणून मी अभ्यास करू शकले. सलील जन्मला तेव्हा घरातील कोणीही माझ्यासोबत थांबू शकलं नव्हतं, तेव्हा माझ्या आईसारखी त्यांनी माझी काळजी घेतली. मला येणाऱ्या कोणत्याही संकटात ते माझ्या पाठीशी उभे राहिले. सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगात त्यांची साथ मला आहे. म्हणून मी माझं करिअर उत्तम प्रकारे करू शकले. प्रेम व्यक्त करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात. अशा किरकोळ गोष्टींवर आम्ही दोघं कधीही भांडलेलो नाहीत. जे सोयीस्कर आहे ते करायचं हे दोघांनी ठरवलं. तुमचे बाबा माझ्यावर प्रेम करतातच आणि माझंही त्यांच्यावर प्रेम आहे!”
मंजिरी त्यांना बरंच काही सांगत होती. दोघं ऐकत होती. त्यांना माहीत नसलेले अनेक किस्से त्यांनी आईकडून ऐकले. दोघांनीही आईला मिठी मारली. आज त्यांना प्रेमाचा असाही अर्थ कळला होता!
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smita joshi606@gmail.com)