“हेमांगी, नक्की काय झालं ते मला सांगशील का? तू अशी नुसतीच रडत बसलीस तर काय झालं ते मला कसं समजणार?”

“सुनिधी, मला आज ‘आई’ म्हणून ‘नालायक’ ठरवण्यात आलं. इतके दिवस माझा नवरा मला दूषणं द्यायचा, मी संसारात कशी कमी पडते ते ऐकवायचा… पण दुसऱ्याला नावं ठेवून मीच कसा चांगला हे सतत सिध्द करण्याचा त्याचा स्वभावच आहे म्हणून मी दुर्लक्ष करत राहिले. मात्र आज माझ्या मुलींनी माझ्यावर वाटेल ते आरोप केले. ते मला सहन होत नाहीयेत.”

“अगं, मुलींचं बोलणं एवढं काय मनावर घेतेस?”

“मनाला लागेल असचं बोलल्या त्या. मी त्यांच्यासाठी एवढं केलं, पण त्याची त्यांना किंमत नाहीये. मी माझ्या ऑफिसमधल्या एका सहका-याबरोबर त्याच्या गाडीवरून घरी आले, हे बघून माझ्या नवऱ्यानं माझ्यावर संशय घेतला. माझ्या दोन्ही मुलींनी मला पाठिंबा तर दिला नाहीच, पण ‘बाबांचं बरोबरच आहे,’ असं म्हणून एक प्रकारे माझ्या चारित्र्यावर आरोप केले. हे एका आईसाठी अत्यंत लाजिरवाणं आहे. म्हणजे नव-याच्या मते मी बायको म्हणून यशस्वी होऊ शकले नाही आणि मुलींच्या दृष्टिकोनातून ‘आई’ म्हणूनही मी हरले! मला वाटतंय, की संपवून टाकावं हे आयुष्य!”

हेही वाचा : भारतातली पहिली व्हिडिओ फुटबॉल महिला विश्लेषक- अंजिता एम

“हेमांगी,काहीतरीच काय बोलतेस? अगं, मुलींचा काही तरी गैरसमज झाला असेल. तू समजून घे आणि त्यांच्याशी एकदा बोलून तर बघ…”

“माझ्या मुलीही स्वार्थी आहेत गं… मला त्यांच्याशी आजिबात बोलायचं नाहीये. तू सांग, त्या माझ्याशी असं का वागल्या असतील?”

“मुलींवर असा राग धरण्यात काहीच अर्थ नाही. तुम्हा दोघा पती-पत्नींमध्ये नेहमीच वाद होतात. याचा परिणाम तुमच्या मुलींवर झालेला आहे. तुमची भांडणं त्यांच्यासमोर होतात. तुम्ही दोघं एकमेकांच्या चारित्र्यावर वारंवार सतत आरोप करत राहता. एकमेकांना सोडून देण्याची, घटस्फोटाची भाषा करता. त्यामुळे त्या सतत एका असुरक्षित वातावरणात राहतात. आपल्याला नक्की आईसोबत राहावं लागणार, की बाबांसोबत, हेच त्यांना कळत नाही. तुम्ही दोघंही एकमेकांबद्दल कधीच चांगलं बोलत नाही. ‘तुमची आई किती वाईट आहे. ती कशी वागते,’ याबाबद्दल तो मुलींना सांगत राहतो आणि ‘तुमचे बाबा माझ्याशी किती वाईट वागतात,’ असं तू सांगत राहते. त्यामुळे खरं काय आणि कसं वागावं हे त्यांना कळत नाहीये. अशा वेळी फक्त मुलींना दोष देऊन कसं चालेल?”

“ते सगळं खरंय गं, पण त्यांनी माझ्या चारित्र्याबद्दल असा विचार करणं मला योग्य वाटलं नाही”

“हेमांगी, त्या अशा का वागल्या याची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला, तर तुझ्या लक्षात येईल. हे बघ, अपेक्षा आणि वास्तविकता यांमध्ये फरक असेल, तर मनामध्ये निराशा उत्पन्न होते आणि त्याच्या प्रतिक्रिया अशा प्रकारे होऊ शकतात. बऱ्याच वेळा मुलांच्या मनात समाजमाध्यमांतून दाखवल्या गेलेल्या आईची प्रतिमा असते. पण वास्तविकता तशी नसते. मग आपली आई अशी का? याबद्दल त्यांच्या मनात राग, द्वेष निर्माण होऊ शकतो. बऱ्याच वेळा वयात येणाऱ्या मुलींना तर आईनं आपल्यापेक्षा छान दिसलेलंही आवडत नाही, जास्त फॅशन केलेली आवडत नाही, तिनं कोणत्याही विरुद्धलिंगी व्यक्तीशी हसूनखेळून बोललेलं आवडत नाही. आईनं ‘आईसारखंच’ वागावं, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे मुली तुला बोलल्या असल्या, तरी तू त्यांच्याबद्दल मनात राग न धरता, त्यांच्याशी मोकळेपणानं संवाद साध. जोडीदाराला दोष न देता तुझी बाजू पटवून देण्याचा प्रयत्न कर. मुलींच्या आणि तुझ्या नात्यामध्ये अंतर येणार नाही, यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यामुळे मुलींच्या मनावर ताण निर्माण होणार नाही. मुख्य म्हणजे नवरा-बायकोनं मुलांसमोर भांडणं, आपल्या सोईसाठी मुलांच्या मनात समोरच्याविषयी काही ना काही भरवून देण्याचा प्रयत्न करणं, हे थांबवायला हवं.”

हेही वाचा : एकोणिसाव्या वर्षी झाली ‘CA’! गिनीज बुकातदेखील नोंद! कोण आहे ही तरुणी ते घ्या जाणून….

सुनिधीच्या बोलण्यावर हेमांगी विचार करत होती. तिला तिचं लहानपण आठवलं. त्यांच्या शेजारी राहणारे कधी तरी काका जेव्हा घरी यायचे आणि आईशी गप्पा मारायचे, ते तिला आजिबात आवडायचं नाही. आई त्यांच्याशी का बोलते? त्यांना त्यांच्या घरी निघून जायला का सांगत नाही? असं तिला वाटायचं. त्या काकांचा तर राग यायचाच, पण त्यापेक्षा तिला आईचा राग जास्त यायचा. त्या वयात काहीही विचार मनात यायचे. अपेक्षा विरुद्ध वास्तव, असं द्वंद्व मनात चालू असल्यामुळे मुली आपल्याशी तसं वागल्या असतील, हे तिच्या लक्षात आलं. मुलींबद्दलचा राग मनात न ठेवता त्यांच्याशी कसं बोलायचं, याच नियोजन करण्याचं तिनं ठरवलं. आणि अर्थातच नवऱ्याशीही भांडणांबद्दल सामंजस्यानं बोलायला हवं, असं ठरवलं.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(smita joshi606@gmail.com)