केतकी जोशी

बऱ्याचजणी व्यायाम म्हणून सायकलिंग करतात, तर काहीजणी सुट्टीच्या दिवशी किंवा वीकएंडला ठरवून सायकलिंग करत कुठेतरी जवळपास ट्रीपला जातात. आपल्यापैकी बऱ्याचजणींना सोलो म्हणजे एकटीने ट्रीप करायला आवडतं. हा खास ‘Me Time’ असतो. अशी सोलो सायकल ट्रीप अनेकदा शरीराबरोबरच मनालाही ताजंतवानं करते.

मस्त पावसाच्या सरी, गार हवा आणि अगदी छान मन प्रसन्न करणारी हवा. अशावेळेस आपली सायकल आणि फक्त आपण… एनर्जी देणारी अशी सोलो सायकल ट्रीप तुमच्यापैकी काहीजणींनी नक्की केली असेल. बऱ्याचजणी व्यायाम म्हणून सायकलिंग करतात, तर काहीजणी सुट्टीच्या दिवशी किंवा वीकएंडला ठरवून सायकलिंग करत कुठेतरी जवळपास ट्रीपला जातात. आपल्यापैकी बऱ्याचजणींना सोलो म्हणजे एकटीने ट्रीप करायला आवडतं. हा खास ‘Me Time’ असतो. अशी सोलो सायकल ट्रीप अनेकदा शरीराबरोबरच मनालाही ताजंतवानं करते. अशी ट्रीप सुरू करून ती संपेपर्यंत तुमच्या व्यक्तिमत्त्वात प्रचंड बदल घडतो.      

सायकलवर ट्रीप करणाऱ्या ग्रुप्सही आहेत. या ट्रीपमध्ये अनेकजण सोबत असल्याने तसं फार टेन्शन नसतं. पण तुम्ही जर सोलो सायकल ट्रीप करणार असाल आणि विशेषत: ही जर तुमची सोलो सायकल ट्रीप करण्याची पहिलीच वेळ असेल तर या काही टीप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा. म्हणजे तुमची ही सोलो सायकल ट्रीप कायमची आठवणीत राहील आणि पुढे अशा अनेक ट्रीप्स करण्याची हिंमतही मिळेल.

१. तयारी आणि नियोजन- कोणत्याही ट्रीपसाठी नियोजन आणि पूर्वतयारी गरजेची आणि तितकीच महत्त्वाची असते. त्यात सोलो सायकल ट्रीपसाठी तर ते अत्यावश्यकच आहे. तुम्ही जाणार असलेला मार्ग नीट समजून घ्या. तिथे जाताना ट्रॅफिकची परिस्थिती, रस्ते कसे आहेत, गर्दी कधी असते, पर्यायी मार्ग कोणते आहेत याची पूर्ण माहिती ट्रीपवर निघण्याआधीच करून घ्या.

तुमच्या ट्रीपच्या दरम्यान ज्या ज्या ठिकाणी तुम्ही थांबणार आहात, त्या प्रत्येक ठिकाणचे हवामान कसे असेल हे माहिती असणंही गरजेचं आहे. त्यासाठी  Weather App ची मदत घ्या. विशेषत: पावसाळ्यात काही मार्ग बंद होतात का? पाऊस जास्त असतो का वगैरे गोष्टी जाणून घ्या. प्रत्येक वेळेस निघताना पुढच्या ठिकाणाचा आढावा घ्या. महत्वाचं म्हणजे तुमची सायकल उत्तम स्थितीत आहे ना हे तपासा. दूरवरचा प्रवास तुम्ही तुमच्या सायकलवरून करण्याएवढी तुमची सायकल चांगल्या स्थितीत पाहिजे.

२. मानसिक तयारी : सोलो ट्रीम ही जितकी उत्साहवर्धक असते तितकीच ती आव्हानात्मकही असते. प्रवासात अचानक कोणतीही समस्या येऊ शकते, अशावेळेस तुम्ही तातडीने आवश्यक ती कृती करण्याची गरज असते. त्यामुळे कायम जागरूक असणं गरजेचं आहे. अगदी ताण येईपर्यंत सलग सायकलिंग करणे टाळा. आवश्यक तिथे ब्रेक घ्या आणि आसपासचा परिसर, वातावरण, एन्जॉय करा. एकट्याने पूर्ण प्रवास करण्याएवढे तुम्ही मानसिक सक्षम असाल तेव्हाच सोलो सायकलिंग ट्रिपला निघा.

३ .सुरक्षितता

सोलो सायकलिंग ट्रीपमध्ये तुमच्याबरोबर प्रत्यक्ष कुणी येणार नसलं तरी तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुमच्या या ट्रीपमधील प्रत्येक गोष्टीची माहिती असू द्या. प्रवासातील महत्त्वाचे टप्पे, थांबे, प्रवासाचा संपूर्ण कार्यक्रम त्यांच्याबरोबर शेअर करा. तुमची परत येण्याची तारीख, वेळ त्यांना सांगून ठेवा. तुमच्यासोबत मोठी सामानाची बॅग ठेवता येणार नाही. छोट्या पाऊचमध्ये पोर्टेबल चार्जर, प्रथमोचाराचे साहित्य आणि काही महत्त्वाचे फोन नंबर लिहिलेला एक कागदही ठेवा. जर काही अडचण किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर स्थानिक आपत्कालीन सेवा, पोलीस, अँब्युलन्स हे नंबरही माहिती करून घ्या. शक्य असेल तर पोर्टेबल वाय-फाय हॉटस्पॉट घ्या. हवामान आणि प्रवासानुसार आरामदायी कपडे घाला. शक्यतो रात्री सायकलवर प्रवास करण्याचे टाळा. पण रात्री प्रवास करणारच असाल तर त्या रस्त्याची नीट माहिती घ्या, सतर्क राहा.

४. कमी पण योग्य सामान

कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या वस्तू व्यवस्थित पॅक करा. तुम्ही सायकलवरून एकट्याने प्रवास करणार असल्याने फार सामान जवळ बाळगू नका. ज्या गोष्टी तुम्हाला प्रवासात सहज मिळू शकतात, त्या बरोबर घेऊ नका. सायकलिंग करताना डिहाड्रेशन होऊ नये यासाठी लागणाऱ्या पावडर किंवा एनर्जीने भरपूर असलेले पदार्थ मात्र आवर्जून बरोबर ठेवा. राहण्यासाठी जागा शोधताना शक्यतो कॅम्पसाईट्स किंवा बजेटमध्ये असणाऱ्या हॉटेल्सचाच विचार करा. महत्त्वाचं म्हणजे, एक नकाशा, जीपीएस डिव्हाईस, किंवा जीपीएस असलेला स्मार्टफोन या ट्रीपमध्ये नेहमी तुमच्याबरोबर ठेवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. किरकोळ दुरुस्ती शिकून घ्या

ट्रीपवर निघण्यापूर्वी सायकलची स्थिती उत्तम असली तरी कदाचित मध्येच प्रवासात काहीतरी बिघाड होऊ शकतो. त्यामुळे सायकलची किरकोळ दुरुस्तीबाबत निघण्यापूर्वीच माहिती करून घ्या. एखादा छोटासा टूलकिट अवश्य जवळ बाळगा. म्हणजे रस्त्यात गरज लागली तर कोणावरही अवलंबून न राहता तुम्ही तुमची सायकल दुरुस्त करू शकाल. या अगदी छोट्याशा टीप्स लक्षात ठेवल्यात तर तुमची सोलो सायकल ट्रीप नक्कीच आनंददायी आणि अविस्मरणीय होईल.