Virat Kohli : नुकताच विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडत शतकांची हाफ सेंच्युरी केली आणि नवा विक्रम आपल्या नावे नोंदवला. सर्व स्तरावरुन विराटचे कौतुक केले जात आहे. हा क्षण भारतीयांसाठी, त्याच्या चाहत्यांसाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी खूप मौल्यवान होता. विराटची वर्षभरातील कामगिरी उत्तम आहे. पण एक वेळ अशी होती की विराटच्या हातून सर्व निसटत होतं, तेव्हा विराटबरोबर एक व्यक्ती होती ज्या व्यक्तीने विराटला इथपर्यंत आणण्यास मदत केली. ती म्हणजे त्याची पत्नी अनुष्का शर्मा.

अनुष्का शर्मा.. एक उमदं व्यक्तिमत्त्व. आत्मविश्वासू आणि तितकीच मेहनती. स्वत: ती एक उत्तम अभिनेत्री असून तिचे जवळपास सर्वच चित्रपट सुपरहिट आहेत. विराटला जगासमोर विराट बनवण्यामागे तिचा खूप मोलाचा वाटा आहे. स्वत: विराट तिला खूप महत्त्व देतो. विराटने बऱ्याचदा सांगितले आहे की तो अनुष्काकडून बऱ्याच गोष्टी शिकला. तो एका मुलाखतीत सांगतो, “जेव्हापासून अनुष्का माझ्या आयुष्यात आली, मी खूप काही शिकलो. मला बऱ्याच गोष्टींची समज आली. खूप अक्कल आली. तिने मला कुठे विराम द्यायचा, हे सांगितले. मी माझ्या आयुष्यात ज्या स्टेजवर आहे, त्याचा पुरेपुर कसा वापर करायचा हे मी तिच्याकडून शिकलो.”

विराट कोहलीची सपोर्ट सिस्टिम असणारी अनुष्का एकेकाळी अनेकांना खटकत होती. सोशल मीडियावर आणि क्रिकेटमधील दिग्गज लोक विराटच्या वाईट खेळीचा आरोप थेट अनुष्काच्या उपस्थितीवर लावायचे. जेव्हा सुरुवातीला विराटचं नाव अनुष्काबरोबर जोडले गेले तेव्हा तिला अनेक नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागला. पण ती नेहमीप्रमाणे खंबीरपणे उभी राहली आणि विराटला क्षणोक्षणी साथ दिली.

याविषयी विराट एका मुलाखतीत सांगतो, “२०१४ मध्ये इंग्लडमध्ये ती माझ्याबरोबर होती. तिला कळत होतं माझ्याबरोबर काय घडत आहे, तेव्हा तिने सातत्याने मला प्रोत्साहन दिलं. मला पुढे जाण्यास मदत करत राहली. ती ऑस्ट्रेलियाच्या वेळी पण सोबत होती. ती माझ्याबरोबर टूरवर आल्यामुळे आमच्यावर बरीच टिका झाली, पण तरीसु्द्धा तिने साथ सोडली नाही. तिलाही खूप सहन करावं लागलं.”

हेही वाचा : मुलींच्या साक्षरतेचा प्रजनन दराशी काय संबंध आहे? स्त्रियांविषयी अपमानाची भाषा कधी थांबणार…

वाईट काळात तिने नेहमीच विराटला खूप पाठिंबा दिला. करिअरमधील चढ-उतारांना कसे धीराने तोंड द्यायचं हे तिने त्याला शिकवलं. अनुष्कामुळे विराटच्या स्वभावातही खूप बदल झालेला दिसून येतो. स्वत: विराटने याविषयी अनेकदा कबुली दिली आहे.
करिअरच्या उंचीवर असताना अनुष्काने विराटशी लग्न केले. एका अभिनेत्रीपेक्षा ती विराटची पत्नी म्हणून स्वत:ला जास्त बघते. लग्नापूर्वी सामन्यातील वाईट कामगिरीचा आरोप झेलण्यापासून ते लग्नानंतर विराटचे कर्णधारपद जाण्यापर्यंत ती नेहमी बरोबर होती आणि आजही आहे. प्रत्येक सामन्याला ती प्रेक्षकांमध्ये बसून विराटच्या खेळीसाठी टाळ्या वाजवते. त्याच्या प्रत्येक षटकार आणि चौकारवर तिचा आनंद गगनात मावेनासा असतो. ती त्याला नेहमी प्रोत्साहन देते. विराटसुद्धा जगाची पर्वा न करता थेट मैदानावरुन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतो.

हेही वाचा >> Ind vs Pak: प्रिय अनुष्का, थँक ‘यू’!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरं तर अनुष्कासारखी महिला अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. एक जोडीदार म्हणून ती नेहमी विराटची सपोर्ट सिस्टीम राहली. वाईट काळात जोडीदाराला कसं प्रोत्साहित करायचं, कसं समोर न्यायचं, त्यांच्यात आत्मविश्वास कसा वाढवायचा आणि कोणी कितीही टिका करो, स्वत:वर लक्ष केंद्रित कसं करायचं, हे कुणी तिच्याकडून शिकावं. असं म्हणतात, पत्नीचं जर सहकार्य असेल तर पतीचे यश निश्चित आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते आणि हे विराट आणि अनुष्काच्या नात्यात स्पष्टपणे दिसून येते.