आयुष्यात दृढनिश्चय केला, तर आपण कोणतंही ध्येय अगदी सहज साध्य करू शकतो. अशाच धाडसी ‘इनायत वत्स’ यांच्या संघर्षाची कथा आपण जाणून घेऊयात…सध्या सोशल मीडियावर या हरियाणाच्या लेकीचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे. इनायत अवघ्या तीन वर्षांच्या असताना म्हणजेच साधारण २० वर्षांपूर्वी त्यांचे वडील मेजर नवनीत वत्स देशसेवा करताना एका दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झाले. वडिलांच्या आठवणीत तसेच त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी इनायत यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. कठोर परिश्रम व जिद्दीच्या बळावर त्या लेफ्टनंट या पदावर भारतीय सैन्यात देशसेवा करण्यासाठी दाखल झाल्या आहेत.
सध्या इनायत यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यात त्यांनी लष्करात भरती होत असताना वडिलांचा गणवेश परिधान केल्याचं पाहयला मिळत आहे. ज्यांच्या नावातच दयाळू भाव आहे अशा इनायत यांच्या डोक्यावरून वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्ष वडिलांचं छत्र हरपलं. एवढ्या लहान वयात वडिलांचं निधन होऊनही त्या खचल्या नाहीत. जाणत्या वयात आल्यावर त्यांनी धीर न सोडता कठोर मेहनत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिल्ली येथून पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
इनायत वत्स या दिल्लीच्या श्रीराम महाविद्यालयाच्या पदवीधर आहेत. तर, हिंदू महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी संपादन केली. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये त्या चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये (OTA) दाखल झाल्या होत्या. हरियाणा सरकारने हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबाबतच्या धोरणानुसार त्यांना राजपत्रित नोकरीसाठी विचारणा केली होती. परंतु, इनायत यांनी स्वत:हून ही ऑफर नाकारली.
हेही वाचा : चुलीनेच दिली ओळख! जेवण बनवून लोकांची प्रेरणा बनलेल्या ‘या’ मराठमोळ्या अन्नपूर्णा! कसा होता त्यांचा प्रवास
वडिलांसाठी इनायत यांचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते आणि आई शिवानी यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मायलेकींचं हे स्वप्न पूर्ण झालं. इनायत यांच्या आई भावूक होत म्हणाल्या, “माझी लेक एका धाडसी सैनिकाची मुलगी आहे. इनायत पदवीधर झाल्यावर राज्य सरकारच्या नोकरीत रुजू होईल असं वाटत होते. परंतु, तिने सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.” शिवानी वत्स २७ वर्षांच्या असताना त्यांचे पती हुतात्मा झाले होते. त्यावेळी त्यांच्या लग्नाला केवळ चार वर्षे पूर्ण झाली होती. याशिवाय त्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम पाहत होत्या. या सगळ्या कठीण काळात सैन्यदलातील सर्वांनीच मदत केल्याचं शिवानी आवर्जून सांगतात.