Gift Ideas for Women’s : जगभरात ८ मार्च रोजी जगातील महिला दिवस साजरा केला जातो. अनेक वर्षांपासून पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये केवळ चूल आणि मूल एवढीच भूमिका बजावणाऱ्या स्त्रिया आता सध्याच्या आधुनिक युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. हा बदल स्त्रियांचे हक्क, समान संधी या सगळ्यांबद्दल समाजात जागरूकता वाढविण्यासाठी जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो.
तुमच्या आयुष्यातील स्त्रियांना मग ती आई असूदे, बहीण, बायको किंवा मैत्रीण; या सर्वांना त्यांच्यासाठी काहीतरी छान भेटवस्तू देऊन, महिला दिनाच्या शुभेच्छा देता येऊ शकतात. तसेच महिलादेखील या दिवशी स्वतःसाठी काहीतरी विशेष करून किंवा स्वतःसाठी एखादी खास भेटवस्तू घेऊन हा दिवस साजरा करू शकतात. त्यासाठी इंडिया टुडेने दिलेली अत्यंत भन्नाट आणि वेगळ्या गोष्टींची यादी पाहा.
Women’s Day 2024 gift idea : महिला दिनासाठी खास भेटवस्तू टिप्स
१. स्वतःची काळजी घेण्यासाठी काही विशेष वस्तू
वर्षभर चोवीस तास घर, ऑफिस आणि स्वयंपाकघरात काम करणाऱ्या स्त्रियांना आज एक दिवस आराम मिळावा यासाठी त्यांना ‘स्पा’ किंवा ‘मसाज’संबंधी गोष्टी देता येतील. तसेच स्किन केअर किटदेखील देता येऊ शकतात.
अरोमा थेरपीसाठी सेंटेड कँडल्स, शरीराला आराम देणारे विविध प्रकारचे चहा अशी उत्पादने हासुद्धा भेटवस्तू म्हणून एक उत्तम पर्याय आहे.
मऊ आणि उबदार असे ब्लँकेटदेखील तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. पुरेशी आणि शांत झोप लागण्यासाठी जर तुम्ही कुणाला असे उबदार ब्लँकेट दिलेत तर त्यांना ते नक्कीच आवडू शकते.
२. खाद्यप्रेमी महिलांसाठी विशेष वस्तू
या दिवशी तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, बायकोला एखाद्या फूड टेस्टिंग किंवा वाईन टेस्टिंगसाठी घेऊन जाऊ शकता. स्वयंपाकाची आवड असलेल्या व्यक्तीला खास एका दिवसाचे कूकिंग क्लास असतात, तिथे घेऊन जाऊ शकता. त्या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ विविध पद्धतींनी बनवण्याची कला, पाककलेची आवड असणाऱ्या स्त्रिया शिकू शकतात.
एखादे रेसिपी बुक किंवा स्वयंपाक करण्यासाठी उपयुक्त अशा वस्तूही भेट म्हणून देऊ शकता.
अथवा, सर्वात सोपे म्हणजे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांनी सजवलेली सुंदर अशी बास्केट भेट द्यावी.
३. विविध छंद जोपासणाऱ्या व्यक्तींसाठी भेटवस्तू
संगीत किंवा नाटकांची आवड असणाऱ्या स्त्रियांना एखाद्या म्युझिक कॉन्सर्ट, सिनेमा किंवा नाटक पाहण्यासाठी घेऊन जाऊ शकता.
फिरायची आवड असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला वीकेंडनिमित्त बाहेर फिरण्यासाठी घेऊन जाऊ शकता. एखाद्या ट्रिपचे नियोजन करू शकता.
चित्रकला, हस्तकलेची आवड असलेल्या व्यक्तींसाठी तुम्ही खास त्या उपयोगी वस्तू भेट म्हणून देऊ शकता.
या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या आई, बहीण, मैत्रीण, बायको यांच्यासाठी नक्कीच करू शकता. तसेच ज्या स्त्रियांना स्वतःसाठी वेळ द्यावासा वाटत असेल, तर वर दिलेल्या यादीपैकी तुम्ही स्वतःसाठी एखादी गोष्ट नक्कीच करून पाहू शकता आणि जागतिक महिला दिवस साजरा करू शकता.