अनेकदा आपले आयुष्य हे अतिशय सुरळीत चालू असताना अचानक नियती आपल्यावर आघात करते आणि आपल्यासमोर समस्यांचा अक्षरशः डोंगर उभा करते. परंतु, कोणत्याही अवघड आणि खडतर परिस्थितीशी सामना करून जी व्यक्ती नव्याने उभारी घेते, अशी व्यक्ती समाजात अनेकांना प्रेरणा देण्याचे काम करते. अनेकांसाठी एक आदर्श म्हणून उभी राहते. आज आपण अशाच एका अतिशय प्रेरणादायी व्यक्तीबद्दल माहिती घेणार आहोत.
प्रीती बेनीवाल हे एक असे व्यक्तिमत्व आहे, जिने तिच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष आणि अडथळ्यांची शर्यत पार करून यशस्वीरीत्या आयएएस हे पद मिळवले आहे. तिच्या आयुष्यात नेमके कोणते चढ-उतार आले, तसेच त्या सर्वांवर कशी मात केली, ते आपण जाणून घेऊ.
शिक्षण आणि कौटुंबिक परिस्थिती
प्रीती मुळची हरियाणामधल्या दुपेडी गावात लहानाची मोठी झाली आहे. प्रीतीचे शिक्षण तिच्या गावाजवळच्या फाफडाणा गावात एका खाजगी शाळेत झाले होते. तसेच तिने दहावीच्या परीक्षेतदेखील खूप चांगले गुण मिळवले होते. प्रीतीचे वडील हे पानिपत थर्मल प्लांटमध्ये नोकरी करत असत. तसेच तिची आई बबिता ही जवळच्या अंगणवाडीत काम करत होती.
दहावी यशस्वीरीत्या पास झाल्यानंतर, प्रीती बारावीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मतलौदा येथे गेली आणि इसराना कॉलेजमधून तिने बी.टेक व एम.टेक या दोन्ही विषयांमध्ये पदवी प्राप्त केली.
नोकरी
प्रीतीने तिचे एम.टेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, वर्ष २०१३ ते २०१६ या काळात बहादूरगडमधील एका ग्रामीण बँकेत लिपिक म्हणूनही काम केले. २०१६ नंतर तिने २०२१ पर्यंत एफसीआयच्या [FCI] सहाय्यक जनरल II या पदावर कर्नालमध्ये काम केले. इतके वर्ष काम केल्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये तिची परराष्ट्र मंत्रालयात, सहाय्यक विभाग अधिकारी म्हणून निवड झाली आणि त्यानंतर प्रीतीने दिल्ली परराष्ट्र मंत्रालयात काम करण्यास सुरुवात केली.
प्रीतीच्या आयुष्यातील खडतर प्रवास
खरंतर, प्रीती डिसेंबर २०१६ मध्ये एफसीआयमध्ये विभागीय पदोन्नतीसाठी [डिपार्टमेंटल प्रोमोशन] गाझियाबाद इथे परीक्षा देणार होती. मात्र दुर्दैवाने, गाझियाबाद रेल्वेस्थानकावर प्रीतीचा मोठा अपघात झाला. कुणालाही काही कळण्याच्या आत प्रीती वेगाने येणाऱ्या रेल्वेसमोर आली आणि ती गाडी तिच्या अंगावरून गेली.
एवढ्या प्रचंड अपघातानंतर प्रीतीवर १४ सर्जरी कराव्या लागल्या होत्या, त्यामुळे जवळपास एक वर्षभर ती पलंगाला खिळून होती. इतक्या भयंकर प्रसंगानंतरदेखील प्रीतीचे दुःख संपले नाही. अपघातानंतर प्रीतीच्या नवऱ्याने तसेच सासरच्या मंडळींनी प्रीतीचा पुन्हा स्वीकार केला नाही, परिणामी तिचा संसार मोडला.
मात्र, एखादे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, तसेच काहीसे प्रीतीने केले. तिने आपले आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि प्रचंड मेहनत घेऊन यूपीएससीची परीक्षा दिली. मात्र, तिचे दोन प्रयत्न असफल ठरले. अखेरीस वर्ष २०२० मध्ये कोणत्याही कोचिंगशिवाय, प्रीती परीक्षेत उत्तीर्ण झाली. तसेच तिने ७५४ रँकदेखील पटकावला होता.
“आपले आयुष्य हे कोणत्याही परीक्षेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. हे सांगण्याचे कारण असे की, आपण अनेकदा बातम्या ऐकतो, ज्यामध्ये विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न करतात. खरंतर एखाद्या परीक्षेचा आपल्या आयुष्यावर इतका प्रभाव कसा पडू शकतो, याबद्दल मला आश्चर्य वाटते. माझ्या सांगण्याचा अर्थ इतकाच आहे की, स्वतःला कुणापेक्षाही कमी लेखू नये किंवा दुसरी व्यक्ती आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे असा समज करून घेऊ नका. तुम्ही शांतपणे, तुमचे शंभर टक्के प्रयत्न करत राहा, कोणत्याही गोष्टीची भीती मनात बाळगू नका”, असा संदेश प्रीतीने नवीन पिढीसाठी दिला असल्याचे डीएनएच्या एका लेखावरून समजते.